आरतीच्या मृत्यूने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
By admin | Published: April 4, 2017 05:45 PM2017-04-04T17:45:22+5:302017-04-04T17:45:22+5:30
नाशिक येथे सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : सातपूर (जि. नाशिक) येथे सासरच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेने आत्महत्या केली. आरती गौरव सावकार (वय २७) असे तिचे नाव आहे. तिच्या मृत्यूने कोल्हापुरातील तिच्या माहेरच्या पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक येथील सातपूर पोलिसांनी संशयित पती गौरव आप्पासाहेब सावकार (३१), सासरे आप्पासाहेब रामचंद्र सावकार (५५), सासू सुनीता (५०) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
भगवानराव पाटील हे व्यवसायाने वकील. त्यांचे मूळ गाव वाडीभागी, (ता. शिराळा). अनेक वर्षांपासून ते लक्षद्वीपनगर, शाहूपुरी येथे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुले. थोरली मुलगी आरती हिने एम. सी. ए.ची पदवी घेतली. दोन मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. आरती लहानपणापासून हुशार असल्याने ती लाडात वाढली होती. तिचे बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करायचे स्वप्न होते.
दि. २ जानेवारी २०१६ रोजी तिचे नाशिक येथील गौरव सावकार याच्याशी पंधरा लाख रुपये खर्च करून राजेशाही थाटात लग्न करून दिले. लाडक्या मुलीला २५ तोळे सोनेही घातले. गौरव सावकार याचा अंबड औद्योगिक वसाहतीत शिवमंगल मल्टीकोटर्स नावाचा लघुउद्योग आहे. विवाहानंतर पती, सासू-सासऱ्यांनी आरतीला चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र पतीसह सासू-सासऱ्यांकडून माहेरहून पैशाची मागणी होऊ लागली. शिळे अन्न खायला देणे, सासू-सासऱ्यांच्या शरीराला मसाज करणे, गाडी-चप्पल पुसायला लावणे अशी कामे लावून त्यांनी तिचा छळ सुरू केला. यापूर्वी तिने वडिलांना त्रासाची माहिती दिली. दर महिन्याला ते नाशिकला जाऊन तिला आधार देत. पतीसह सासू-सासऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.
शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने अखेर आरतीने दि. २ एप्रिल रोजी सासरच्याच घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मुलीच्या आत्महत्येची माहिती समजताच आई-वडिलांसह दोघा भावांना धक्काच बसला. हाता-खांद्यावर खेळलेल्या आणि लहानाची मोठी करून सासरच्या घरी पाठविलेल्या लाडक्या मुलीचा मृतदेह पाहून पाटील कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आरतीच्या मृतदेहावर नाशिक येथेच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)