कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 03:50 PM2018-11-14T15:50:15+5:302018-11-14T16:00:21+5:30
केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड/कोल्हापूर : केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.
सद्या ऊसपिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे . व ऊस पिकात दबा धरून बसलेले हे गवे अचानक हल्ला चढ़वत असल्याने गव्यांचा हल्ल्याचे वाढले आहे. यावरती वनविभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी होत असताना, केवळ जुजबी कारवाई करून वेळ मारून नेली जात असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी बोलुन दाखवले.
बळवंत भिकाजी जाधव हे आपल्या ' सुतारकी ' नावाच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी ,पाट तयार करण्यासाठी गेले होते . ते पाट खनत असताना पाठीमागुन आलेल्या गव्याने अचानक त्यांचावर हल्ला चढवला. जोराचा धडकेने ते जमिनीवर कोसळले.
कांही कळायच्या आत गव्याने पुन्हा त्यांचावर हल्ला चढवला त्यात त्यांचा डाव्या पायाला जोरदार धडक बसल्याने व शिंगे मांडीत घुसल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यात त्यांचा हात व डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. ते कसेबसे ऊसातुन बाहेर आले व तेथेच कोसळले. शेजारीच प्राथमिक शाळेच्या क्रिडांगणावर खेळ खेळणाऱ्या तरुणांनी हा प्रकार बघुन आरडा - ओरड करून गावकऱ्यांना जमा केले .व जखमी जाधव यांना पढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले.
पण धक्कादायक बाब अशी की , गेली तिन ते चार दिवस हा गवा याच परिसरात वास्तव्यास असुन व ही बातमी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहीत होती. पण ग्रामस्थांना तशा कोणत्याच सुचना वन विभागाकडून मिळाल्या नव्हत्या व त्या गव्याला तेथुन हुसकावून लावण्या संदर्भातही कोणतीच कारवाई त्यांनी केलेली नाही.
त्याचा कोणताच पत्ता बळवंत जाधव यांना नसल्याने ते आज या शेताकडे गेले व त्या गव्याने त्यांना लक्ष केले. त्यात त्यांना गंभीर इजा झाली आहे. वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज परिसरात अशी दुसरी घटना घडली. केवळ या शेतकऱ्यांचे ' दैव बलवत्तर ' म्हणुनच 'जीवावर आलेले दुखापतीवरच निभावले '.
सद्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील बहुतांशी पुरुष मंडळी ऊसतोडी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात व घरातील महिला ऊसांना पाणी देणे, भांगलनीची कामे करण्यासाठी शेताकडे जातात. पण परिसात हा गवा गेली चार दिवस तळ ठोकून असल्याने महिला वर्गात कमालीची भिती पसरली आहे. हा गवा बहुधा बित्तरलेला असावा त्यामुळे तो हा परिसर सोडून जात नाही . त्याला वन विभागाने त्वरीत हुसकावून लावावे. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे .