कसबा बावड्यातील ‘एबी गँग’ कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

By उद्धव गोडसे | Published: June 5, 2024 03:37 PM2024-06-05T15:37:23+5:302024-06-05T15:37:40+5:30

पोलिस अधीक्षकांची प्रस्तावास मंजुरी, गुन्हे रोखण्यासाठी कारवाई

AB Gang from Kasba Bawda expelled from Kolhapur district | कसबा बावड्यातील ‘एबी गँग’ कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

कसबा बावड्यातील ‘एबी गँग’ कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, मारामारी असे गंभीर गुन्हे करून कसबा बावडा परिसरात दहशत निर्माण करणा-या एबी गँगला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंजुरी दिली.

गँगचा प्रमुख अक्षय शेखर बागडी (रा. दत्त मंदिराजवळ, कसबा बावडा), साहील कादर शेख (रा. आंबेडकर वसाहत, कसबा बावडा) आणि सौरभ दीपक जाधव (रा. कनाननगर) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

दारूची तस्करी करणे, बेकायदेशीर दारू विकणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे अक्षय बागडी याच्या एबी टोळीवर दाखल आहेत. वारंवार सूचना देऊन आणि प्रतिबंधात्मक कारवाया केल्यानंतरही या टोळीत सुधारणा झाली नाही. अखेर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी टोळी प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. अधीक्षक पंडित यांच्या सूचनेनुसार गडहिंग्लज उपविभागाचे उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी प्रस्तावाची चौकशी केली. एबी टोळीच्या उच्छादामुळे कायदा सुव्यवस्थेला बाधा येत असल्याने तिघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याच्या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक पंडित यांनी मंजुरी दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी एबी गँगला जिल्ह्याबाहेर पाठवले.

उल्लंघन झाल्यास तक्रारी द्या

हद्दपारीची कारवाई झालेले गुन्हेगार जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यास कळवावे. संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. तसेच कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणा-या टोळ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही अधीक्षक पंडित यांनी सांगितले.

Web Title: AB Gang from Kasba Bawda expelled from Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.