‘आबा’, ‘आबाजी’ हे मुश्रीफ-सतेज पाटील यांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:32+5:302021-03-20T04:23:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत माजी आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आदींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये पॅनलची रचनेसह इतर खलबते झाली, खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे कोल्हापुरात आल्यानंतर उद्या, रविवारी आघाडीची घोषणा केली जाणार आहे.
सत्तारूढ गटापासून सहा संचालकांनी फारकत घेतली असून, त्यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक घेऊन आघाडीची घोषणा करण्याचे निश्चित झाले होते. मात्र खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने दिल्लीत आहेत. ते उद्या, कोल्हापुरात येणार असून, त्यानंतर एकसंधपणे विरोधी आघाडीची घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी विरोधी आघाडीतील नेत्यांची बैठक घेतली. पॅनलची रचना, कोणत्या तालुक्यात काय करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीला माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, अजित नरके, बाबासाहेब चौगुले उपस्थित होते. आमदार राजेश पाटील यांनी आपण तुमच्यासोबतच आहोत असे आघाडीच्या नेत्यांना सांगितले आहे.
तगडी आघाडी
तीन मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अर्धा डझन माजी आमदार व प्रमुखांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी आकारास येणार आहे. संघाचे संस्थापक दिवगंत नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांच्याबद्दल दूध उत्पादकांत असलेली सहानुभूतीची भावना लक्षात घेऊन व त्यांच्याच विचाराने ‘गोकुळ’ चालवू, असा संदेश देण्यासाठी विरोधी आघाडीस ‘आनंदराव पाटील-चुयेकर परिवर्तन’ पॅनल असे नाव चर्चा आहे.
सहा संचालक विरोधी आघाडीत
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील-सरूडकर, विलास कांबळे हे विद्यमान संचालक विरोधी आघाडीसोबत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
दोन्ही बैठकांची एकच वेळ
सत्तारूढ गटाने दुपारी ४ वाजता संचालकांची बैठक ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित केली होती. त्याचवेळी विरोधी गटाने मोरेवाडी येथील शांतीनिकेतन येथे याच वेळेला बैठक आयोजित केली होती. एकाच वेळी बैठक असल्याने इकडे तिकडे करण्याची संधी नव्हती.