अबब, एक हापूस आंबा ६२५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:56+5:302021-02-12T04:21:56+5:30
कोल्हापूर : कोकणचा राजा हापूस आंब्याची गुरुवारी आजवरच्या उच्चांकी दराच्या विक्रमासह कोल्हापुरात एन्ट्री झाली. बाजार समितीत झालेल्या मुहूर्ताच्या साैद्याला ...
कोल्हापूर : कोकणचा राजा हापूस आंब्याची गुरुवारी आजवरच्या उच्चांकी दराच्या विक्रमासह कोल्हापुरात एन्ट्री झाली. बाजार समितीत झालेल्या मुहूर्ताच्या साैद्याला ४ डझनाच्या पेटीला तब्बल ३० हजार, तर एक डझनाच्या बॉक्सला ७ हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या समितीत सकाळी हा साैदा निघाला.
या हंगामातील पहिल्या आंब्याची बुधवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मालवण येथील सचिन गोवेकर, देवगडमधून वासुदेव चव्हाण आणि भाई आयरेकर या तीन आंबा उत्पादकांकडून ४ डझनाच्या दोन पेट्या आणि १ डझनाचे १५ बॉक्स अशी आवक झाली होती. इब्राहीम बागवान यांच्या अडतीत झालेल्या सौद्यात ४ डझनाच्या पेटीला सर्वाधिक ३० हजार रुपयांची बोली लावून प्रसाद वळंजू यांनी खरेदी केला. एक डझनाचा बॉक्स ७ हजार रुपये या दराने जयवंत वळंजू यांनी खरेदी केला.
सौद्याला समितीच्या अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील, बळीराम पाटील, दगडू भास्कर, समिती सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, फळ बाजार विभाग निरीक्षक सचिन कामिरे उपस्थित होते.
चौकट ०१
आभासी दर तरीही सौदे
मुहूर्ताला सर्वाधिक दर मिळतो; पण तो आभासी असतो. हंगामात हा दर कधीही मिळत नाही आणि या दराने घेणे ग्राहकांनाही कधी परवड नाही. तरीदेखील दरवर्षी नित्यनेमाने मुहूर्ताचे सौदे काढले जातात.
चौकट ०२
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आंब्यांचा सौदा निघाला होता. ४ डझनाच्या पेटीचा दर २५ हजार रुपये इतका उच्चांकी मिळाला होता. यावर्षी त्यात आणखी ५ हजारांची भर पडून तो ३० हजार असा समितीच्या इतिहासात सर्वाधिक दराचा असा नोंद झाला.
फोटो: ११०२२०२१-कोल-समिती आंबा
फोटो ओळ: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी या हंगामातील पहिल्या हापूस आंब्याचा सौदा राष्ट्रवादीचे नेते नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.