‘अब्बा, मंै तो कलेक्टर बन गया’

By admin | Published: June 25, 2016 12:18 AM2016-06-25T00:18:42+5:302016-06-25T00:41:57+5:30

अन्सार शेख यांनी उलगडला यशाचा प्रवास

'Abba, it became a collector' | ‘अब्बा, मंै तो कलेक्टर बन गया’

‘अब्बा, मंै तो कलेक्टर बन गया’

Next

आयुब मुल्ला -- खोची --निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गेलो. बराच वेळ तेथे थांबून राहिलो. अखेर सायंकाळी तेथून बाहेर पडलो. काही वेळातच मित्राचा फोन आला तू यशस्वी झालास अन् मी माझ्या खिशातला साधा किपॅडचा फोन काढला अन् फोनवरून म्हणालो, ‘अब्बा, मैं कलेक्टर बन गया! रिक्षा चला रहा हूँ, सुनाई नही आता और एक बार बोलो क्या हुआ? अब्बा मैं कलेक्टर बन गया!’ यूपीएससीत यशस्वी झालेल्या अन्सार शेख यांनी अशी माहिती पहिल्यांदा आपल्या वडिलांना सांगितली. त्याच अन्सार यांनी आपला यशस्वी प्रवास सांगताना हे संवादाचे व वाटचालीचे वर्णन वास्तवपणे मांडले. पाय ठेवायलाही जागा नसणारे सभागृह खचाखच भरले होते. त्यांच्या या यशाच्या संवादाला सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
युनिक अकॅडमीच्यावतीने शुक्रवारी सकाळी आय.ए.एस. झालेले अन्सार शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपला यशाचा मार्ग सांगितला. केशवराव भोसले नाट्यगृह विद्यार्थ्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते.
अन्सार शेख यांच्या आतापर्यंतच्या यशाला प्रतिकूलतेचे अनेक कंगोेरे आहेत. आपला प्रवास उलगडताना त्यांनी सांगितलेले किस्से मनाचा ठाव घेणारे आहेत. वडील रिक्षा चालविणारे, आई मजुरी करणारी, दोन बहिणी, एक लहान भाऊ असे कुटुंब. घरात शिकलेले कोणीही नव्हते. चौथीतून शाळा बंद करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता; पण माझ्या गुणवत्तेची खात्री शाळेतील गुरुजींनी वडिलांना दिली. दहावीला ७६ टक्के गुण मिळाले. अकरावी-बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो; पण हे होत असताना अंधकारमय व शोषित कुटुंबात जीवन
जगल्याच्या वेदना टोचत होत्या. मी सातवीत असतानाच परिस्थितीच्या दबावामुळे आई मनोरुग्ण
झाली. ही तर माझ्यावर दडपणाचा आघात करणारी घटना होती. मी डगमगलो नाही. पुण्यात आलो. नोकरी करीत आर्टस्मधून ग्रॅज्युएट झालो.
दोन-तीन मित्रांनी पुस्तके घेण्यासाठी पैसे दिले. खर्चालाही सतत मदत केली. युनिकचे तुकाराम जाधव यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. सर्व परीक्षांचा अभ्यास नियोजनपूर्वक केला व पास झालो. पुण्यासारख्या श्रीमंत कुटुंबीयांच्या मुलामुलींचे स्टँडर्ड अन् माझी गरिबी याची मी तुलना केली नाही. माझ्या प्रत्येक पावलांवर अंधार, संघर्ष होता; पण त्यातून मला प्रकाशाची वाट
दिली ती शिक्षणाच्या आत्मविश्वासाने. त्यामुळे वयाच्या
२१ व्या वर्षी मी कलेक्टर झालो. यशस्वी होण्यासाठी स्पर्धा स्वत:च्या दुर्गुणाशी करा, अभ्यासात सातत्य ठेवा, संयमी राहा, सकारात्मक विचार करा, प्रचंड मेहनत करून इच्छाशक्ती बाळगा, टार्गेटवरच फोकस करा, श्रद्घा ठेवा, असाही सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. झोपडपट्टीत राहणारे अन्सार शेख इतके दिलखुलास वास्तव मांडत गेले अन् गर्दीने भरलेल्या नाट्यगृहात प्रेरणादायी वातावरण तयार होऊन यशस्वी वाटचालीस टाळ्यांचा कडकडाट होत प्रतिसाद मिळाला.

शेळगाव (जि. जालना) या ग्रामीण बाज असलेल्या मागासपणाच्या छायेत असणाऱ्या गावातील अन् दारिद्र्यरेषेखाली गरीब कुटुंबात जन्मलेल्या अन्सार यांचा यावर्षीच्या यूपीएससीतील लक्षवेधी चेहरा ठरला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्याचे केडर जाहीर झाले. राज्यात मराठी माध्यमातून व वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ते एकमेव यशस्वी ठरले आहेत.
४वडिलांना घरकुलासाठी ३० हजार रुपये मंजूर झाले होते. ते मिळविण्यासाठी लाच द्यावी लागली, असे मला वडिलांनी सांगितले. तेव्हाच मी ठरविले. मोठा अधिकारी बनून गरिबांना न्याय देणारी सेवा करायची. यादृष्टीने प्रयत्न केले.

Web Title: 'Abba, it became a collector'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.