गांधीनगरच्या व्यापाऱ्याचे अपहरण
By admin | Published: January 8, 2016 01:28 AM2016-01-08T01:28:54+5:302016-01-08T01:29:15+5:30
चौघांचे कृत्य : तपासासाठी पोलीस पथके रवाना; गुन्ह्याची नोंद नाही
गांधीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गांधीनगर बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी श्यामलाल कन्हैयालालाल निरंकारी (रा. निरंकारी कॉलनी, वळिवडे, ता. करवीर) यांचे गुरुवारी पहाटे अज्ञातांनी अपहरण केले. तावडे हॉटेल परिसरात हा प्रकार घडला. अल्टो कारने आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचे समजते. या घटनेची गांधीनगर पोलिसांत नोंद नसली तरी अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके निपाणी, बेळगाव, मिरज, म्हैशाळ येथे रवाना झाली आहेत.
गांधीनगर बाजारपेठेत श्यामलाल यांचे होजिअरीचे दुकान आहे. निरंकारी ट्रस्टमध्ये योगदान दिलेले श्यामलाल सेवाव्रती आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे तावडे हॉटेल परिसरात ते फिरायला गेले असता पाळत ठेवून असलेल्या चौघाजणांनी त्यांना मारुती आल्टो कारमध्ये जबरदस्तीने बसविले व पोबारा केला. याबाबतची माहिती घटना पाहणाऱ्यांनी (र समजताच निरंकारी यांच्या घरी वरिष्ठ पोलिस अधिकारी आले. त्यांनी सर्व माहिती घेताच निपाणी, बेळगाव म्हैशाळ, मिरज येथे पोलिसांची पथके रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अपहरणकर्ते सापडले नव्हते. तावडे हॉटेल परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामधील फुटेजवरून तपास सुरू आहे.
दरम्यान, अपहरणकर्त्यांचा शोध बेळगाव पोलिसही घेत आहेत. याबबत रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती.
तपासाबाबत कमालीची गोपनियता पोलिसांनी बाळगली आहे.
गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड अपहरणकर्त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
दोन कोटींच्या खंडणीची मागणी
अपहरण झालेल्या श्यामलाल निरंकारी यांचे अपहरण झाल्याचे वृत्त पसरताच त्यांच्या घरासमोर जमाव जमला. याचवेळी निरंकारी कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. अपहरणकर्त्यांनी श्यामलाल यांच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपये द्या अन्यथा तुमच्या माणसाचे बरे-वाईट होईल, पोलिसांत गेला तर याद राखा, अशी धमकी दिल्याची चर्चा घरासमोरील जमावात होती.
दोन वर्षांतील तिसरी घटना गेल्या दीड ते दोन वर्षांतील ही गांधीनगर बाजारपेठेतील अपहरणाची तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली आहे. निरंकारी कुटुंबीयांना येणाऱ्या धमक्यांमुळे ते चिंताग्रस्त आहेत.