अब्दुललाटमध्ये ग्रा. पं.समोर टाकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:19+5:302021-03-23T04:24:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अब्दुललाट : येथे कचरा उठाव आंदोलनाला बेदखल केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या दारात या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अब्दुललाट : येथे कचरा उठाव आंदोलनाला बेदखल केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या दारात या कचऱ्याचा ढीग केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे, याविषयी जागृती करून ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच याबाबत अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी निवेदन आणि समक्ष सूचना केल्या होत्या.
मात्र, या गंभीर विषयाची दखल न घेता ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक आरोग्य, पाणी स्वच्छतेचा लोकप्रतिनिधींना विसर पडल्याचे म्हटले जात आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत:च कचरा उठाव करण्याबाबत आवाहन करत कामाला सुरुवात केली. मात्र, सरपंच, उपसरपंच, सदस्य अथवा ग्रामसेवक या उपक्रमाकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत गोळा केलेल्या कचऱ्याचा ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ढीग रचला. येत्या आठवडाभरात गावातील कचरा हटवला नाही तर कचरा गोळा करून सरपंचांच्या दालनात आणि सर्व सदस्यांच्या दारात ढीग रचला जाईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात डॉ. दशरथ काळे, प्रा. संजय परिट, ओमप्रकाश पाटील, शरद पाटील, विनायक माळी, पायगोंडा पाटील, महावीर गाडवे, विज्ञान उपाध्ये, अनिल कुडाळकर, राकेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.