अब्दुललाटचे पांडुरंग मोरे यांचे सरपंचपद अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:51+5:302021-08-12T04:29:51+5:30
अब्दुललाट : येथील सरपंच पांडुरंग मोरे-भाट यांचे सरपंचपद अपात्र ठरले आहे. तसेच त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविता येणार ...
अब्दुललाट : येथील सरपंच पांडुरंग मोरे-भाट यांचे सरपंचपद अपात्र ठरले आहे. तसेच त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविता येणार नाही. सन २०१८ साली विविध विकासकामांच्या निविदेचे लखोटे बेकायदेशीररित्या मुदतीपूर्वी फाडले. याबाबतची तक्रार संजय अण्णाप्पा कोळी व अंकुश पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. अपात्रतेबाबतचे पत्र ग्रामसेवक राहुल माळगे यांना प्राप्त झाले होते.
गावातील विविध विकासकामांसाठी ठेकेदारांकडून सन २०१८ साली निविदा मागविल्या होत्या. या निविदा मुदतीपूर्वी सरपंच मोरे यांनी फाडल्या होत्या. याप्रकरणी गटविकास अधिकारी शिरोळ यांच्याकडे तक्रार झाली होती; पण या तक्रारीवर कारवाई होण्यासाठी विलंब लागत होता. तेव्हा गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय कोळी व अंकुश पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्त व गटविकास अधिकाऱ्यांकडे मोरे यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करून त्यांचे सरपंचपद अपात्र ठरवावे, याचा अर्ज केला होता. त्याचा निकाल लागून मोरे यांचे पद अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, सरपंच मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.