अभाविपचा कुलगुरूंच्या दालनात ठिय्या,शिवाजी विद्यापीठ परिसर सुरू करण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 07:51 PM2021-01-27T19:51:38+5:302021-01-27T19:53:35+5:30
Shivaji University Abvp Kolhapur- महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ परिसर तात्काळ सुरू करावा. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या विद्यापीठातील कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविणाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यापीठ शाखेने बुधवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केले.
कोल्हापूर : महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ परिसर तात्काळ सुरू करावा. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या विद्यापीठातील कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविणाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यापीठ शाखेने बुधवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केले.
विद्यापीठामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@ कोल्हापूर या कार्यक्रमाला सोशल डिस्टन्सिंग, कोविड नियमांचे पालन करण्यात आले नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव विद्यापीठ आणि राज्य सरकारव्दारे महाविद्यालय, विद्यापीठ परिसर सुरू करण्याची परवानगी नाकारण्यात येते. त्याचा अभाविपकडून निषेध करण्यात येत आहे.
मंत्री सामंत यांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याबाबतचे पुरावे सादर करत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यार्थी परिषदेचा कुठल्याही कार्यक्रमाला विरोध नाही, परंतु त्यामध्ये कोविडच्या नियमांचे पालन व्हावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवून महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसर तात्काळ सुरू करावा, अशी मागणी विद्यार्थी परिषदेचे महानगरमंत्री ऋषिकेश माळी यांनी केली. यावेळी महानगर सहमंत्री अथर्व स्वामी, जिल्हा गतीविधी राहुल बुडके, जिल्हा समिती सदस्य पूर्वा मोहिते, नारायण धस, आदी उपस्थित होते.
महाविद्यालय, विद्यापीठ परिसर सुरू करण्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. त्यावर शासनाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू