‘ब्रह्मपुरी’वरील बांधकामांना अभय, शिवाजी पुलाच्या कामात कोलदांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:52 PM2019-05-07T13:52:12+5:302019-05-07T13:53:42+5:30
पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडचण ठरणाऱ्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवर अनधिकृत अनेक खासगी बांधकामे झाली, पण पुरातत्व विभाग या अनधिकृत बांधकामांना आजपर्यंत कधीही नोटीस बजावत नाही आणि सार्वजनिक काम असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाला मात्र कायद्याचा धाक दाखवून कामात कोलदांडा आणत असल्याची चर्चा कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे.
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडचण ठरणाऱ्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवर अनधिकृत अनेक खासगी बांधकामे झाली, पण पुरातत्व विभाग या अनधिकृत बांधकामांना आजपर्यंत कधीही नोटीस बजावत नाही आणि सार्वजनिक काम असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाला मात्र कायद्याचा धाक दाखवून कामात कोलदांडा आणत असल्याची चर्चा कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे.
ब्रह्मपुरी टेकडीखाली प्राचीन कोल्हापूरचा इतिहास गाडला असल्याने या टेकडीला विशेष महत्त्व आहे. १९४५-४६ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तज्ज्ञांनी व विद्यार्थ्यांनी या ब्रह्मपुरी टेकडीवर काही ठिकाणी उत्खनन केले. त्या उत्खननात पुरातत्व अवशेष आढळले. त्यामुळे या ब्रह्मपुरी टेकडी आणि टेकडीच्या १०० मीटर परिसरात उत्खनन करण्यास पुरातत्व विभागाने कायद्याने निर्बंध घातले आहेत.
हाच आधार घेत पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला पुरातत्व विभागाचा अडथळा येत आहे. त्यामुळे गेल्याच वर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाने ब्रह्मपुरी टेकडीपासून पुलापर्यंत अंतराचे मोजमाप केले असता ते १०० मीटरच्या बाहेर दिसून आले; पण त्यानंतरही पुरातत्व विभागाच्या निर्बंधाचा अडथळा पुलास आणला जात आहे.
पुलाचे हे सार्वजनिक काम असल्याने त्याला नोटिसा बजाविणाऱ्या पुरातत्व विभागाला त्या ब्रह्मपुरी टेकडीवर झालेली अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का? या टेकडीवर विद्युत खांब उभारताना तसेच बीएसएनएल कंपनीच्या केबलसाठी केलेल्या उत्खननाची कायद्याने अडचण आली नाही का? असे विविध प्रश्न नागरिकांतून चर्चीले जात आहेत. टेकडीवरील बांधकामाकडे पुरातत्व विभागाने नेहमीच डोळेझाक कारभार केला आहेच, तसेच त्यांना आतापर्यंत नोटीसही बजावली नसल्याची चर्चा आहे.