राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने केली रौप्य पदकाची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 06:53 PM2021-12-11T18:53:39+5:302021-12-11T19:19:46+5:30
महिलांच्या वरिष्ठ गटात ६०० पैकी ५७८ गुण मिळवून तिने रौप्यपदकाची कमाई केली. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली
कोल्हापूर - दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर स्पोर्टस पिस्तल प्रकारात तिने हे पदक पटकावले.
तिने या स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात ६०० पैकी ५७८ गुण मिळवून रौप्यपदकाची कमाई केली. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. ती भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असून तिला प्रभारी संचालक प्रा. डॉ. रवींद्र मराठे, व्यवस्थापन प्रमुख डॉ. आर. डी. जाधव, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर, इंद्रजित देसाई, वैशाली पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, गेल्या ६ डिसेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेची चँम्पियन नेमबाज राही सरनोबत हिने डॉ. करणीसिंग शूटिंग रेंजवर ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी चँम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून विजयाची हॅट्रीक केली. तर अनुष्का पाटील हिने सांघिक युवा गटात १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. यानंतर आज अभिज्ञा हिने पटकावलेल्या या पदकामुळे कोल्हापूरची मान पुन्हा एकदा उंचावली गेली.