आपत्तीग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भांडी मांडून अभिनव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:56 PM2019-12-23T17:56:52+5:302019-12-23T18:01:16+5:30
कोल्हा पूर : शिरोळ तालुक्यामध्ये महा पूर व अवकाळी पावसाने नागरिकांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे ...
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यामध्ये महापूर व अवकाळी पावसाने नागरिकांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे या तालुक्याला आपत्तीग्रस्त तालुका घोषित करुन शासकिय सवलती द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी आपत्तीग्रस्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव धरणे आंदोलन केले.
किसान दिनानिमित्त शिरोळचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी व शिरोळ नगरपरिषदेच्या नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपत्तीग्रस्तांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी संसारोपयोगी भांडी व साहित्य रस्त्यावर मांडून, मूर्ती कारांनी महापूरात बुडालेल्या मुर्ती, तसेच शेतकऱ्यांनी कुजलेला ऊस घेवूनच अभिनव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने व अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर पंचगंगा कृष्णा नदी प्रदुषणाचीही भर पडली आहे. त्याचा मानवी जीवनावर आणि शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. याचा विचार करून शासनाने शासकीय सवलती दिल्या पाहिजेत. महापूरानंतर गायरान आणि गावठाण असा भेदभाव न करता सर्वांना समान नुकसान भरपाई द्यावी.
आंदोलनात सुधा जाधव, विजया कोळी, बाबूराव जगदाळे, प्रमिला कुंभार, प्रशांत रजपूत, भरत मिणचे, गणेश कुंभार, रचना माने, विद्या देशिंगेकर आदी सहभागी झाले होते.
शिरोळ तालुका आपत्तीग्रस्त घोषित करुन शासकिय सवलती द्या, या मागणीसाठी आपत्तीग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव धरणे आंदोलन केले. (छाया : नसीर अत्तार)