अभिरूचीतर्फे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेस प्रतिसाद, दहा स्पर्धकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:59 PM2019-05-27T15:59:25+5:302019-05-27T16:01:31+5:30
हौशी व नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने अभिरूची संस्थेतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.
कोल्हापूर : हौशी व नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने अभिरूची संस्थेतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.
गेली ३८ वर्षे नाट्य आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या संस्थेमार्फत गेल्यावर्षीपासून कोल्हापूरच्या गायकांना सिंगिंग आयडॉलच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. यंदाही या स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला असून त्यात १२५ जणांनी सहभाग घेतला होता.
सहभागी झालेल्या गायकांनी प्राथमिक फेरीत ‘अधीर मन’, ‘गारवा’, ‘ऐ जिंदगी गले लगा ले’, ‘इश्क’,‘सुफियाना’, ‘चला जाता हूँ ’ आदी नवी जुनी गीते हार्मोनियम व तबला आणि कराओकेच्या साथीवर गायली. पहिल्या फेरीतून निवड झालेले दहा जणांची चार जूनला होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. या गायकांना थेट आॅकेस्ट्रावर लाईव्ह सादरीकरण करावे लागणार आहे.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. भाग्यश्री मुळे, महेश हिरेमठ यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष प्रसाद जमदग्नी, सचिव जितेंद्र देशपांडे, खजानिस मीना ताशिलदार, स्पर्धा प्रमुख केतकी जमदग्नी व अभिरूचीचे युवा रंगकर्मी उपस्थित होते.