मॉल संस्कृतीला टक्कर देण्याची क्षमता शेतकरी संघात, धैर्यशील माने यांचे गौरवोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:23 PM2019-06-12T12:23:50+5:302019-06-12T12:25:27+5:30
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने साता समुद्रापार नावलौकिक मिळविला असून, सध्याच्या मॉल संस्कृतीला त्याच ताकदीने टक्कर देण्याची क्षमता संघात ...
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने साता समुद्रापार नावलौकिक मिळविला असून, सध्याच्या मॉल संस्कृतीला त्याच ताकदीने टक्कर देण्याची क्षमता संघात असल्याचे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. शेतकरी संघाला नाबार्ड कडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.
शेतकरी सहकारी संघाच्या वतीने मंगळवारी खासदार माने व खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने होते. खासदार मंडलिक म्हणाले, शेतकरी संघ सहकारातील आदर्श असून, आपल्या कार्यकर्तृत्वाने संघाने आशिया खंडात नाव कमवले. केंद्र सरकारकडून संघाला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत राहूच, त्याशिवाय नाबार्डकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल.
संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्ष माने, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, माजी संचालक युवराज पाटील यांच्या हस्ते खासदार माने व मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले, जी. डी. पाटील, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी आभार मानले.