सातत्यपूर्ण प्रयत्नांनीच अबोलांना संवादाची अनुभूती
By admin | Published: June 18, 2015 12:08 AM2015-06-18T00:08:46+5:302015-06-18T00:43:53+5:30
शिल्पा हुजूरबाजार : स्पीच थेरपीतील कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित
पहिल्या दोन वर्षांत बालकांची भाषाकेंद्रे विकसित होतात़ या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाचन-लेखनाची उद्दिष्टे सातत्याने गाठल्यास, वाचा दोष असलेल्या बालकांना संवादाची अनुभूती देणे शक्य आहे़ त्यासाठी आवश्यकता आहे ती पालकांच्या जनजागृतेची आणि स्पीच थेरपीची, असे मत संवादतज्ज्ञ शिल्पा हुजूरबाजार यांनी व्यक्त केले़ येथील डॉ़ व्ही़ टी. पाटील फौंडेशनतर्फे हुजूरबाजार यांना डॉ़ शोभना तावडे-मेहता ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा पुरस्कार स्पीच थेरपीतील कार्यासाठी देण्यात आला़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने साधलेल्या संवादामध्ये हुजूरबाजार यांनी संवादाच्या अनेक धड्यांवर प्रकाश टाकला़
प्रश्न : वाचा दोष कसा उद्भवतो?
उत्तर : मुलांच्या बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष असतो़ त्यामुळे वाचा दोष उद्भवतो़ श्रवण व दृष्टी दोषांमुळेही ही समस्या आढळते़ अनुवंशिकता, जन्मताच मूल उशिराने रडणे, अपुरे वजन, मेंदूज्वर तसेच मेंदूला आघात, टाळ दुभंगणे, ओठ दुभंगणे, जीभ अडकणे, आदी कारणांमुळे वाचा दोषाची समस्या निर्माण होते़ याशिवाय गतिमंदत्व आणि सेरेब्रल पाल्सी यामुळेही वाचा दोष निर्माण होतो़
प्रश्न : वाचा दोषाची लक्षणे कोणती?
उत्तर : वाचा दोष असलेली बालके बोलण्याचा प्रयत्न करीत नाहीत़ बोलण्याऐवजी खुणांनी, इशाऱ्यांनी, रडून संवाद साधण्याचा प्रयत्न करते़ पालकांनी बोललेले त्यांना समजत नाही़ त्यांच्याकडून हाकेला उत्तर मिळत नाही़ बालक जन्माला आल्यानंतर त्याच्या श्रवण तपासण्या केल्यानंतर स्पीच थेरपिस्टनी दिलेल्या सूचनांनुसार बालकांच्या बोलण्यावर लक्ष ठेवल्यास वाचा दोषाचे आकलन होण्यास मदत होते़ साधारणत: गतिमंदत्व, मतिमंदत्व, स्वमग्नता, कर्णबधिरत्व उच्चारातील अडथळे, आदींच्या तीव्रतेनुसार वाचा दोषाचे प्रमाण कमी-जास्त आढळते़ रिल्स चाचणीद्वारे बालकाच्या वाचा दोषाची तपासणी केली जाते़
प्रश्न : उपाययोजना काय आहेत?
उत्तर : संवाद साधण्यासाठी इच्छुक नसलेल्या मुलांचे निदान वेळीच होणे गरजेचे आहे़ ० ते २ हा वयोगट भाषा केंद्रे विकसित होण्याचा काळ आहे़ या कालावधीत वाचा दोष असलेल्या बालकांवर संवादाचे संस्कार झाले, तर त्यांची भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता विकसित करता येते़ यासाठी निदानाबरोबरच स्पीच थेरपीची आवश्यकता आहे़ यासाठी विविध प्रकारचे धडे स्पीच थेरपी सेंटर देत असते़ कोणत्याही औषधोपचारांविना केवळ स्नायूच्या हालचालींद्वारे अबोल मुलांना बोलते करता येते़ यासाठी त्यांच्या पालकांनाही प्रशिक्षण दिले जाते़ डोळे, हात, इशारे, चित्र, याद्वारे मुलांना संवादाचे धडे दिले जातात़ मुलांनी बोलते व्हावे, यासाठी त्यांना विविध खाद्यपदार्थ चावायला शिकविले जाते़ जबड्याची हालचाल व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे़
प्रश्न : पालकांनी या समस्येबाबत काय खबरदारी घ्यायला हवी ?
उत्तर : वेळीच निदान अत्यावश्यक आहे़ बालक संवाद साधत नाही, हे लक्षात आल्यानंतर पालकांनी त्याला त्वरित स्पीच थेरपी सेंटरकडे आणले पाहिजे़ या ठिकाणी रिल्स चाचणी घेतली जाते़ चाचणीतील निरीक्षणानुसार आवश्यकतेप्रमाणे संवादाचे धडे दिले जातात़ हे धडे मुलांना घरीही दिले पाहिजे़ बोलण्यासाठी भाषा आवश्यक आहे़ भाषा सन्मान देते, पण बोलताच येत नसेल तर या मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन ती कायमची दुबळी बनतील़ हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा़ त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करायला हवी़ वाचा दोषाबाबत पालकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे़ सध्या आम्ही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील वाचा दोष असलेल्या बालकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे़
प्रश्न : संवाद वाढीसाठी काय प्रयत्न आवश्यक आहेत?
उत्तर : आज विभक्त कुटुंबपद्धतीचे प्रमाण वाढत आहे़ नोकरीनिमित्त आई-वडील बाहेर असतात़ अशावेळी मुले सतत टी़ व्ही़ पाहण्यामध्ये मग्न असतात़ संगणकावर तर तासन्तास गेम खेळत असतात़ टी़व्ही़ पाहण्याचे प्रमाण अति होत आहे़ वाचा दोष असलेली मुले, तर याला जास्त आहारी जातात़ आजूबाजूला असलेल्यांचे भानही मुलांना नसते़ त्याचा परिणाम संवाद प्रक्रियेवर होतो़ मोबाईल, टी़ व्ही़ आणि संगणकाचा अतिरेक वापर होत आहे़ हे टाळण्यासाठी दुहेरी देवाण-घेवाण आवश्यक आहे़ ही देवाण-घेवाण वाचनातूनच शक्य आहे़ वाचनसंस्
कृती वाढीस लागली पाहिजे़
प्रश्न : वाचा दोष असलेल्या मुलांचे भविष्य काय ?
उत्तर : वाचा दोष असलेल्या मुलांना स्पीच थेरपीच्या माध्यमातून संवाद साधण्यास परावृत्त केले जाते़ आवाज दोष, उच्चार दोष, भाषादोष असलेल्या बालकांना संवादाचे धडे देऊन साधारण मुलांच्या संवाद पातळीला आणता येते़ ही मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे बोलू शकतात, शिक्षण घेऊ
शकतात़ गतिमंदत्वामुळे किंवा मतिमंदत्वामुळे होणारे दोष हे गंभीर असतात़ पण लेखन, वाचन, सातत्यपूर्ण अवलोकन यामुळे या प्रकारातील बालके व्यवहारासाठी उपयुक्त असलेला संवाद साधू शकतात़ स्वावलंबी जीवन जगू शकतात़ वाचा दोष असलेल्या अनेक मुलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे़
- संदीप खवळे