शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा; साजणी येथील विरोधी कृती समितीची मागणी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 21, 2024 04:31 PM2024-03-21T16:31:36+5:302024-03-21T16:32:13+5:30
बजरंग पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले.
कोल्हापूर : मौजे साजणी (ता. हातकणंगले) येथील जमिनीचे वेगवेगळ्या कारणासाठी दोनवेळा संपादन झाल्याने आत्ता फक्त ७०० एकर जमीन ओलिताखाली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे पून्हा जमिनीचे संपादन तसेच विहीरी, कुपनलिका, नदीवरील पाण्याचे स्त्रोत संपणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी साजणी येथील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
बजरंग पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. नागपूर रत्नागिरी हा सहा पदरी महामार्ग पुर्णत्वास जात असताना नव्याने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. मौजे साजणी गावचे एकूण क्षेत्र ११०० एकर असून त्यापैकी गावठाण हद्दवाढीसाठी गावाभोवतालची १०० ते १५० एकर क्षेत्र जमीन संपादित केली आहे. तसेच यापूर्वीच आौद्योगिकरणासाठी वेगवेगळ्या संस्था व खासगी मालकांनी जमीन संपादित केली आहे. त्यामुळे ११०० एकरपैकी ३०० ते ४०० एकर क्षेत्र कमी झाले आहे. आता फक्त ७०० एकर जमीन ओलिताखाली असून शक्तीपीठ महामार्गासाठी अंदाजे १०० एकर बागायत शेती संपादित करण्याची अधिसूचना शासनाने काढली आहे. यापूर्वी येथे जिरायत शेती होती मात्र शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून गावचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.
ही सगळी बागायती शेती महामार्गात जाणार आहे. यासह या जमिनीवर मोठ्या प्रमाणात विहीरी, कुपनलिका व नदीवरील पाण्याचे स्त्रोत शेतकऱ्यांनी निर्माण केले आहेत. हा पाण्याचा स्त्रोत संपला तर उर्वरीत क्षेत्र निकामी होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळे येणार आहे. तरी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे. यावेळी पांडुरंग पाटील, रंजना पाटील, उज्वला पाटील, प्रकाश पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.