गर्भपाताचा प्रयत्न; डॉक्टर सागावकर ताब्यात-साई रुग्णालयावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:01 AM2019-02-24T01:01:18+5:302019-02-24T01:01:40+5:30
शाहूवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर परिसरातील साई रुग्णालयाच्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, मूळ गाव सागाव, ता. शिराळा, सध्या रा. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर परिसरातील साई रुग्णालयाच्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, मूळ गाव सागाव, ता. शिराळा, सध्या रा. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रुग्णालयावर छापा टाकून ही कारवाई केली. दोन दिवसांत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलीच मोठी कारवाई केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या शाहूवाडीतील तरुणावर आणि संबंधित डॉ. सागावकर यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी सांगितले, शाहूवाडी तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. बदनामीच्या भीतीने त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला व्हीनस कॉर्नर येथील साई रुग्णालयात शनिवारी दुपारी दाखल केले. या प्रकाराची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित रुग्णालयात छापा टाकला.
यावेळी एका रूममध्ये बेडवर पीडित मुलगी झोपली होती. तिला गर्भपात होण्यासाठी डॉक्टरांनी इंजेक्शन दिले होते. पोलिसांनी तत्काळ तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी संबंधित रुग्णालयात पंचनामा करून डॉ. सागावकर यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी रुग्णालयातील परिचारिका, पीडितेचे नातेवाईक, अन्य काही रुग्णांच्या नातेवाइकांचे जबाब घेतले.
तरुणावरही गुन्हा?
बेकायदेशीरपणे गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे, हे माहीत असतानाही डॉ. सागावकर यांनी गर्भपाताचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तसेच पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.