वंशाला हवा दिवा अन् डॉक्टरांना पैसा, हव्यासातून फोफावल्या गर्भपाताच्या टोळ्या 

By उद्धव गोडसे | Updated: February 14, 2025 11:58 IST2025-02-14T11:58:09+5:302025-02-14T11:58:37+5:30

अवैध सोनोग्राफी मशीन सापडत का नाहीत?

Abortion gangs sprung up out of desire for a boy and doctors money | वंशाला हवा दिवा अन् डॉक्टरांना पैसा, हव्यासातून फोफावल्या गर्भपाताच्या टोळ्या 

वंशाला हवा दिवा अन् डॉक्टरांना पैसा, हव्यासातून फोफावल्या गर्भपाताच्या टोळ्या 

उद्धव गोडसे

कोल्हापूर : वंशाला दिवा मुलगाच हवा या पारंपरिक मानसिकतेतून अजूनही समाज बाहेर पडत नाही. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी हजारो रुपये मोजले जातात. सहज लाखो रुपयांची कमाई करण्याची संधी असल्याने काही डॉक्टरांसह बोगस डॉक्टरांच्या टोळ्या यात सक्रिय आहेत. दक्षता समित्यांचे दुर्लक्ष, पोलिसांच्या तपासातील उणिवा आणि कायद्याचा धाक नसल्याने गावोगावी गर्भातच कळ्या खुडल्या जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्यासह शासकीय यंत्रणांना अधिक सक्षम व्हावे लागणार आहे.

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटल्याने अवैध गर्भपात रोखण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी २०१२ मध्ये जिल्ह्यात सायलेंट ऑब्झर्व्हर यंत्रणा कार्यान्वित केली होती. जिल्हाधिकारी बदलताच ती यंत्रणा बंद पडली. त्यानंतर गावोगावी पोहोचणारे मोबाइल सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाल्याने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली.

यावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा खूपच तोकडी आहे. एखाद्या ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईला सुरुवात करताच राजकीय दबाव येतो. छापे टाकून फिर्याद दाखल केल्यानंतर सबळ पुरावे गोळा केले जात नाहीत. संशयितांवर वेळेत आरोपपत्र दाखल होत नाहीत.

न्यायालयात साक्षी आणि पुराव्यांची योग्य मांडणी होत नाही. त्यामुळे अपवाद वगळता या गुन्ह्यात शिक्षा होत नसल्याने कायद्याचा धाक उरलेला नाही. परिणामी पैशाच्या हव्यासातून काही डॉक्टर आणि बोगस डॉक्टरांच्या टोळ्या गर्भपाताचे रॅकेट चालवत आहेत. यातून जन्माला येणाऱ्या मुलींची संख्या आणखी कमी होण्याचा धोका आहे.

..तरच मशीनला परवानगी

स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट यांनाच सोनोग्राफी मशीनची खरेदी करता येते. खरेदी केलेल्या मशीनची नोंदणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करावी लागते. तज्ज्ञांच्या समितीकडून त्याची दर तीन महिन्यांनी तपासणी होते. अर्भकाचे लिंग तपासणीसाठी त्याचा वापर करू नये, अशा सूचना सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत. अर्भकातील नैसर्गिक व्यंगाशिवाय गर्भपात करता येत नाही.

अवैध मशीन येतात कुठून?

गेल्या दोन-तीन वर्षांत झालेल्या कारवायांमध्ये पोलिसांनी चार सोनोग्राफी मशीन जप्त केल्या. या मशीन कर्नाटकातून खरेदी केल्याचे अटकेतील संशयितांनी सांगितले. विशेष म्हणजे याची ऑनलाईन खरेदीही होते. कारवाईत जप्त केलेली बहुतांश मशीन नोंदणीकृत नाहीत.

सश्रम कारावासाची शिक्षा

गर्भलिंग निदान आणि गर्भपात केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास दोषींना पाच ते सात वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात बिद्री (ता. कागल) येथे एकमेव शिक्षा झाली. सबळ पुरावे नसल्याचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार निर्दोष सुटतात.

जिल्ह्यात ३२७ ठिकाणी सोनोग्राफी मशीन

  • एकूण तपासणी केंद्रे - ३२७
  • सुरू असलेले मशीन - २१४
  • (यातील खासगी - १८८)
  • बंद मशीन - ८५
  • न्यायालयीन खटले सुरू - ७


पाच वर्षांतील कारवाया
वर्ष - ठिकाण

  • २०२० - कोडोली (ता. पन्हाळा)
  • २०२१ - इचलकरंजी, परिते (ता. करवीर)
  • २०२२ - पडळ (ता. पन्हाळा)
  • २०२३ - आमजाई व्हरवडे, कसबा वाळवे (ता. राधानगरी), मडिलगे (ता. भुदरगड),
  • २०२४ - क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर, बांबवडे (ता. शाहूवाडी), जोतिबा डोंगर, फुलेवाडी रिंगरोड, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर
  • २०२५ - कळंबा, वरणगे पाडळी (ता. करवीर)


कोट्यवधींची उलाढाल

गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी ३० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांपासून ते मशीन ऑपरेटर, गर्भपाताच्या गोळ्यांचे विक्रेते, पुरवठादार यांची मोठी साखळी आहे. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Abortion gangs sprung up out of desire for a boy and doctors money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.