कोल्हापुरात गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 01:22 PM2024-05-18T13:22:50+5:302024-05-18T13:23:28+5:30

चिखली, मडिलगे खुर्द येथे छापा टाकून सोनोग्राफी मशीनसह साहित्य जप्त

Abortion racket busted in Kolhapur; Four arrested including a doctor | कोल्हापुरात गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह चौघांना अटक

कोल्हापुरात गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह चौघांना अटक

कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणारे आणि गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरसह चौघा एजंटांना करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. युवराज गोविंद चव्हाण (वय ३९, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), संजय कृष्णात पाटील (भोई गल्ली, वरणगे पाडळी, ता. करवीर), डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परूळेकर (गंगाई लॉनजवळ, फुलेवाडी रिंगरोड), विजय लक्ष्मण कोळसकर (मडिलगे खुर्द, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर) अशी त्याची नावे आहेत. आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.

गारगोटी परिसरात गर्भपात केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात करवीर पोलिसांना यश आले. चिखली (ता. करवीर) आणि मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे छापा टाकून पथकाने ही कारवाई केली.

मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे संशयित विजय कोळसकरच्या घरात एका महिलेला गर्भपात करण्यासाठी गोळ्या देत असताना छापा टाकून सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मोहन मदने (४३ रा. प्रतिभानगर ) यांनी करवीर पोलिसांत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदने यांना कोल्हापूर चिखली-आंबेवाडी परिसरात गर्भपाताच्या गोळ्यांची अनधिकृत विक्री करुन गर्भपात करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या प्रकाराची माहिती करवीर पोलिसांना दिली. मदने यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक युसुफ इनामदार यांनी बुधवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चिखलीनजीक एका घरावर छापा टाकला. यावेळी युवराज चव्हाण हा एका महिलेस गर्भपाताच्या, गोळ्या देत असल्याचे निदर्शनास आले. त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गर्भपातासाठी आलेली महिला आणि तिचा पती पळून गेले.

दरम्यान, पोलिसांनी युवराज चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचे एक पाकीट सापडले. त्याच्या घराची झडती घेतली असता पाच ते सहा पाकिटे सापडली. त्याला अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्याच्याकडे गुरुवारी, शुक्रवारी चौकशी केली असता आणखीन काही नावे निष्पन्न झाली. त्याने एजंट संजय पाटील, विजय कोळस्कर, डॉ. हर्षल नाईक-परूळेकर यांचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी या तिघांनाही अटक केली.

वैद्यकीय गर्भपात कायदा रेग्युलेशन २००३चे कलम पाच, वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१सह अन्य कलमांसह गुन्हा दाखल केला. चव्हाण याला तीन दिवसांची तर इतरांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. इतर साहित्य जप्तीची कारवाई सुरू असल्याचे करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

गारगोटी परिसरात गर्भपात

विजय कोळस्कर व हर्षल नाईक हे डॉक्टर म्हणून वावरत होते. चिखली परिसरात रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात होत्या तर गारगोटी परिसरात गर्भपात केला जात होता. गर्भपात करण्यापूर्वी एक दिवस आधी युवराज रुग्णांना गोळ्या देत असल्याचे तपासात उघड झाले.

Web Title: Abortion racket busted in Kolhapur; Four arrested including a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.