कोल्हापूर जिल्ह्यात गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, रंकाळा परिसर, पडळ येथे रुग्णालयावर छापे; तिघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:18 PM2022-04-07T14:18:17+5:302022-04-07T14:18:40+5:30
गर्भपात करणाऱ्या या रॅकेटकडून शहरासह जिल्ह्यात किती काळापासून हा प्रकार सुरु आहे, आजपर्यत कितीजणांचे गर्भपाताचे प्रकार घडले आहेत. याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
कोल्हापूर / यवलूज : शैक्षणिक अर्हता व वैद्यकिय परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास पर्दाफाश केला. कोल्हापुरात अंबाई टॅक परिसरतील हरिओमनगर तसेच पडळ (ता. पन्हाळा) येथील रुग्णालयावर छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह एकूण तिघांना पोलिसांनी अटक केली. एक संशयित एजंट पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पहाटे पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बोगस डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६ रा. करंजफेन, ता. शाहूवाडी. सद्या रा. हरिओम नगर, अंबाई टॅंक परिसर, रंकाळा तलाव परिसर, कोल्हापूर). डॉ. हर्षल रविंद्र नाईक (४० रा. प्रतिराज गार्डन, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर), दत्तात्रय महादेव शिंदे (४२ रा. पडळ, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे असून एजंट भरत पोवार याने पोबारा केला.
जिल्हाधिकारी राहूल रेखावर, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने हा गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
अटक केलेल्या दोन बोगस डॉक्टरांसह तिघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. गर्भपात करणाऱ्या या रॅकेटकडून शहरासह जिल्ह्यात किती काळापासून हा प्रकार सुरु आहे, आजपर्यत कितीजणांचे गर्भपाताचे प्रकार घडले आहेत. याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
शासकिय रुग्णालयातील निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल वेदक, पन्हाळा पंचायत समितचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, डॉ. सुनंदा गायकवाड, सहायक पोलीस निरीषक श्रध्दा आंबले, महीला पोलीस रुपाली यादव यांच्या पथकाने या गर्भपात करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.