३५ लाख फसवणूकीतील फरार आरोपीस अटक
By भीमगोंड देसाई | Published: March 15, 2024 10:10 PM2024-03-15T22:10:08+5:302024-03-15T22:10:17+5:30
शाहुपूरीतील फायनान्स कंपनी : रोज सव्वा टक्क्याचे आमिष
राधानगरी : रोज एक ते सव्वा टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून ३५ लाख रूपयांच्या फसवणूक प्रकरणातील पाच महिन्यापासून फरार असलेल्या अरोपीस राधानगरी पोलिसांनी कोल्हापुरातून अटक केली. अमोल विलासराव मोहिरे (वय ३८, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी आनंदराव प्रकाश घोरपडे ( वय ३८, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) अजून फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून शाहूपुरीतील ब्लॉक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स या कंपन्यांनी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील सागर कांबळे यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार होते. न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करीत होते. मात्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. यामुळे पोलिसांनी अमोल मोहिरे यास अटक केली.
ब्लॉक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख घोरपडे आणि मोहिरे हे दोघे फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादी सागर कांबळे यांच्या घरी गेले. गुंतवणुकीवर रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी पैसे भरण्यास भाग पाडले. तीन महिन्यात दुप्पट रक्कम मिळेल, असे सांगून जास्तीत जास्त पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला २० हजारांच्या गुंतवणुकीवर आठ हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर कांबळे यांनी चार लाख ८० हजार रुपये भरले. त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही. अशाप्रकारे २१ जणांची ३१ लाखांची फसवणूक झाली. या प्रकरणातील आरेापी अमोल यास अटक केल्यानंतर पुढील तपासाला आता गती येणार आहे.