Kolhapur: फसवणुकीच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरारी वकिलास अटक, ११ गुन्ह्यांमध्ये लोकांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:17 IST2024-12-17T12:16:25+5:302024-12-17T12:17:33+5:30
तीन वर्षांची शिक्षा भोगून पळाला होता

Kolhapur: फसवणुकीच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरारी वकिलास अटक, ११ गुन्ह्यांमध्ये लोकांना गंडा
कोल्हापूर : जमीन खरेदीसाठी हातउसने घेतलेल्या पाच लाखांतील चार लाख ६९ हजार रुपये परत न देता फसवणूक करणारा वकील अमोल आनंदराव पाटील (वय ५०, रा. नेजदार पार्क, कसबा बावडा) याला शाहूपुरी पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सप्टेंबर २०१६ मध्ये त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ॲड. पाटील याच्यावर फसवणुकीचे ११ गुन्हे दाखल असून, तीन वर्षांची शिक्षा भोगून तो पळाला होता.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे फिर्यादी उदय मानसिंगराव पोवार (वय ४२, रा. रमणमळा, कोल्हापूर) यांच्याशी ॲड. पाटील याची ओळख झाली होती. याच ओळखीतून त्याने ऑगस्ट २०१६ मध्ये पोवार यांच्याकडे जमीन खरेदीसाठी हातउसने दहा लाख रुपये मागितले. सुरुवातीला पोवार यांनी पैसे देण्यास नकार दिला.
मात्र फारच गळ घातल्याने आणि नोटरी करून सहा महिन्यांत सर्व पैसे परत करण्याचा शब्द दिल्याने पोवार यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये त्याला पाच लाख रुपये दिले. सहा महिने उलटल्यानंतर वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने पोवार यांनी पाटील याच्या नातेवाईकांना फोन लावले. त्यानंतर केवळ ३१ हजार रुपये मिळाले. उर्वरित पैसे मिळत नसल्याने अखेर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, ॲड. पाटील याला दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा भोगून सुटल्यानंतर पसार झालेल्या संशयितास अखेर पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याची १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली.
फसवणुकीचे ११ गुन्हे
ॲड. पाटील याच्यावर कोल्हापूर, गारगोटी, जयसिंगपूर, सांगली, पुणे येथे फसवणुकीचे ११ गुन्हे दाखल आहेत. कमी पैशात वादातील प्लॉट, शेतजमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तीन वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर तो मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमध्ये ओळख लपवून राहत होता. अखेर पुण्यात पोलिस पोलिसांच्या हाती लागला.