Kolhapur: फरार सम्राट कोराणे सहा वर्षांनी न्यायालयात हजर, पोलिस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:52 IST2025-02-06T11:51:42+5:302025-02-06T11:52:00+5:30

पोलिस आज ताबा घेणार 

Absconding Samrat Korane appears in court after six years, case registered in connection with attack on police officers in kolhapur | Kolhapur: फरार सम्राट कोराणे सहा वर्षांनी न्यायालयात हजर, पोलिस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Kolhapur: फरार सम्राट कोराणे सहा वर्षांनी न्यायालयात हजर, पोलिस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूर : यादवनगरातील मटका अड्ड्यावरील कारवाईदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी सम्राट सुभाष कोराणे (रा. वेताळमाळ तालमीजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) फरार होता. तब्बल सहा वर्षांनी बुधवारी (दि. ५) दुपारी तो स्वत:हून जिल्हा न्यायालयात हजर झाला. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या गुन्ह्याचा तपास करणारे शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके हे गुरुवारी कोराणे याचा ताबा घेणार आहेत.

माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या यादवनगर येथील घराजवळ इंडियन ग्रुपच्या खोलीत मटका अड्डा सुरू होता. तत्कालीन प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने ८ एप्रिल २०१९ रोजी छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी मटका चालक आणि त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला होता. पोलिसांचे पिस्तूल पळवले होते.

त्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मटका अड्डे चालवणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे खणून काढली होती. कोल्हापूरसह मुंबईतील एकूण ४४ जणांवर गुन्हा दाखल करून ४२ जणांना अटक केली होती. यातील सम्राट कोराणे आणि प्रकाश उर्फ पप्पू हिरजी सावला हे दोघे फरार होते. सहा वर्षे पोलिसांना चकवा दिल्यानंतर अखेर बुधवारी कोराणे स्वत:हून जिल्हा न्यायालयात हजर झाला.

कळंबा कारागृहात रवानगी

न्यायाधीश कश्यप यांनी कोराणे याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सीपीआरमध्ये वैद्यकीय चाचणी करून पोलिसांनी त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. अटकेची प्रक्रिया करून पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती उपअधीक्षक टिके यांनी दिली.

सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई

या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोराणे हजर झाल्यानंतर आता अखेरचा आरोपी पप्पू सावला याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी अटक केलेल्या सर्व ४२ जणांचा जामीन मंजूर झाला आहे. त्यापैकी शरद कोराणे याचा मृत्यू झाला आहे.

४२ लाखांची रोकड जप्त

तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांकडून ४२ लाखांची रोकड जप्त केली आहे. यातील ३६ लाखांची रोकड मुंबईतील जयंतीलाल ठक्कर याच्या घरातून जप्त केली होती, तर शमा मुल्ला यांच्या घरातून दोन लाख रुपये जप्त केले होते. आरोपींनी पळवलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.

तपास पुन्हा सुरू होताच शरण आला

जुन्या गुन्ह्यांच्या फाईल्स पोलिसांनी पुन्हा उघडल्या आहेत. फरार आरोपी कोराणे याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी त्याच्या शिवाजी पेठेतील घरात आणि इचलकरंजीतील सासरवाडीच्या घरात छापे टाकले होते. पोलिसांकडून पुन्हा तपास सुरू झाल्याचे समजताच तो स्वत:हून न्यायालयात शरण आला.

Web Title: Absconding Samrat Korane appears in court after six years, case registered in connection with attack on police officers in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.