ईडी’च्या गैरवापराची मोदींकडूनच कबुली, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:44 PM2023-02-10T15:44:23+5:302023-02-10T15:45:33+5:30
हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला एका रंगात बांधण्याचा भाजपचा प्रयत्न
गडहिंग्लज : राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ईडी’मुळेच विरोधक एकत्र आल्याची टीका करून ‘ईडी’च्या गैरवापराची अप्रत्यक्षरित्या कबुलीच दिली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी (९) केला.
एका घरगुती कार्यक्रमानिमित्त ते गडहिंग्लजला आले होते. दरम्यान, येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडहिंग्लज विभागाचे समन्वयक विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावंत म्हणाले, सरकारची ताकद देऊन उद्योजक मित्राला वाचवणारे मोदी त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तो भ्रष्टाचार सरकार पुरस्कृतच आहे. परंतु, देशातील विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच ‘ईडी’ सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे.
हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला एका रंगात बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, विविधता मानणारा हिंदू धर्म आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाची शिकवणच त्यांना कळालेली नाही. त्यांचा विचारच मुळात हिंदू धर्माच्या विरोधी आहे. सर्वसमावेशकता हाच देशाचा आधार असून, तोच देशाला तारेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंत म्हणाले..!
- मुश्रीफांच्या घरावर छापा पडल्यानंतर ‘दिल्लीवाल्यांनी वचन पाळलं’ या सोमय्यांच्या विधानातून काय ध्वनीत होते? वारंवार छापे टाकून मुश्रीफांना नाहक त्रासच दिला जात आहे.
- देशातील गंभीर परिस्थितीत एकजूट महत्त्वाची असताना, राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्यालाही त्याचे दु:ख आहे. परंतु, ही पक्षांतर्गत बाब असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी याबाबत योग्य निर्णय घेईल.
- सतेज पाटील यांच्या रूपाने उमदे नेतृत्व काँग्रेसला मिळाले आहे. त्यांची गुणवत्ता पक्षासमोर आहे. त्यामुळे माणिकराव ठाकरेंप्रमाणे त्यांच्या रूपाने मोठी जबाबदारी भविष्यात कोल्हापूरकडे नक्कीच येईल.
भाकड गाई त्यांच्या दारात बांधा
गोहत्या बंदीमुळे निर्माण झालेला भाकड गाईंचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मोदींनी उत्तरप्रदेश व बिहारच्या निवडणुकीत दिले होते. परंतु, निवडणुकीनंतर त्यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारीला ‘काऊ-डे’ साजरा करणाऱ्या भाजपवाल्यांनी वर्षभर ‘काऊ-डे’ साजरा करावा. स्मृती इराणींच्या हॉटेलमध्येही तो साजरा करावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गाई भाजप नेत्यांच्या दारात बांधाव्यात, असा टोमणाही सावंत यांनी लगावला.