निकालातील गोंधळाविरोधात अभाविपची शिवाजी विद्यापीठात निदर्शने, परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी
By संदीप आडनाईक | Published: April 10, 2023 05:03 PM2023-04-10T17:03:31+5:302023-04-10T17:04:11+5:30
हिवाळी सत्रातील काही परीक्षांचे निकाल परीक्षा विभागाने लावले आहेत
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वर्ष २०२२-२३ च्या सत्र परीक्षांच्या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याच्या निषेधार्थ नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. परीक्षेतील निकालाच्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्या परीक्षा नियंत्रकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. स्वत: कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.
शिवाजी विद्यापीठातील हिवाळी सत्रातील परीक्षा सुरु आहेत. यातील काही परीक्षांचे निकाल परीक्षा विभागाने लावले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे गुण प्राप्त करूनही अनुत्तीर्ण दाखवले गेले आहेत, काही विद्यार्थ्यांच्या गुणांच्या जागी स्टार, प्रश्नचिन्ह, हॅशटॅग सारखी चिन्हे दाखवली गेली आहेत, पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करूनही काही विद्यार्थ्यांची पात्रता पूर्ण नाही असे दाखवले गेले आहे, अशा समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.
याप्रकरणी अभाविपने प्रशासनास ५ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांसह अभाविपने विद्यापीठात आंदोलन केले. प्रशासन जोपर्यंत समर्पक उत्तर विद्यार्थ्यांना देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा देऊन गोंधळाला जबाबदार असणाऱ्या परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा देण्याची मागणी अभाविपने केली आहे.
विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. तेव्हा प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि परीक्षा नियंत्रक मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंग जाधव आंदोलनस्थळी आले. त्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. सुधारित निकाल सात दिवसांमध्ये लागले नाहीत, तर परीक्षा नियंत्रक जाधव यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.
या आंदोलनात अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांच्यासह सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, प्रसाद लष्कर, स्वप्निल पाटील, पंकज जत्ते, शिवतेज शेटे, श्रीनाथ साळुंखे आदी कार्यकर्ते आणि विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले होते.