राजर्षी शाहूंकडून वंचितांचे शैक्षणिक समावेशन
By admin | Published: January 7, 2015 11:36 PM2015-01-07T23:36:36+5:302015-01-07T23:56:05+5:30
जयसिंगराव पवार : विद्यापीठात ‘सामाजिक वंचितता’ची कार्यशाळा
कोल्हापूर : सर्व अधोगती आणि विषमतेचे प्रमुख कारण अज्ञान आहे. ते लक्षात घेऊन राजर्षी शाहू महाराज यांनी शैक्षणिक समावेशनातून वंचितांचा विकास साधला. त्या दृष्टीने त्यांनी कार्य केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज, बुधवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील राजमाता अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यासकेंद्रातर्फे आयोजित ‘भारतातील समाजसुधारक आणि त्यांची सर्वसमावेशक धोरणे’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेची सुरुवात डॉ. पवार यांच्या ‘राजर्षी शाहू महाराज यांचे समावेशन धोरण व कार्य’ या विषयावरील बीजभाषणाने झाली. अध्यक्षस्थानी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. ए. बी. राजगे होते.
डॉ. पवार म्हणाले, विषमतेविरोधात लढा देण्याचे नाकारणे याचे कारणदेखील अज्ञानच आहे. सर्व क्षेत्रांतील अधोगती व विषमतेला अज्ञानच कारणीभूत असल्याचे राजर्षी शाहूंनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी वंचितांच्या शैक्षणिक समावेशनाचे कार्य हाती घेतले.
डॉ. राजगे म्हणाले, भारतीय समाज हा शोषण करणारा आणि शोषित अशा दोन वर्गांत मोडतो. उत्पादन साधनांचा सहसंबंध हा सामाजिक वंचिततेशी आहे.
प्रमुख उपस्थितांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. विश्वनाथ शिंदे, वासंती रासम, किशोर खिलारे, शरद पाटील, श्रीधर साळोखे, रियाझ कुरेशी, आदी उपस्थित होते. केंद्राचे संचालक प्रा. रमेश दांडगे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. नीलिशा देसाई यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात दिवसभरात प्रा. प्रल्हाद लुलेकर (औरंगाबाद), प्राचार्या डॉ. योजना जुगळे माजी प्राचार्य दिनकर खाबडे यांनी विविध विषयांवर विचार मांडले.
करवीर संस्थानचे उत्पन्न १५ लाख असताना त्यातील एक लाख रुपये राजर्षी शाहू महाराज शिक्षणावर खर्च करीत होते. विविध जातिधर्मांतील मुलांसाठी त्यांनी वसतिगृहांची उभारणी केली. फासेपारधी तसेच अन्य वंचितांना आपल्या दरबारी काम देऊन त्यांना गैरकृत्यांपासून दूर ठेवले. वंचितांचा विकास शैक्षणिक समावेशनातून साधण्याचे काम त्यांनी देशात पहिल्यांदा केले.
शिवाजी विद्यापीठात बुधवारी सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रातर्फे आयोजित कार्यशाळेत बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. शेजारी डावीकडून ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. ए. बी. राजगे,
प्रा. रमेश दांडगे उपस्थित होते.