MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या नावाने कोल्हापुरात ॲकॅडमी; राज्यातील दुसरी तर, पश्चिम महाराष्ट्रात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 12:40 PM2022-04-23T12:40:21+5:302022-04-23T12:48:25+5:30
भारताचा माजी कसोटीपट्टू आणि माजी वेगवान गोलदांज, मुंबई रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला यांच्या हस्ते याचे उद्घाटन.
कोल्हापूर : क्रिकेटची परंपरा असणाऱ्या येथील शाहूपुरी जिमखानात राज्यातील दुसरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी ॲकॅडमीचे उद्घाटन रविवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता होईल.
भारताचा माजी कसोटीपट्टू आणि माजी वेगवान गोलदांज, मुंबई रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थान भूषवतील, अशी माहिती माजी रणजी खेळाडू आणि पुण्यातील क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमीचे अनिल वाल्हेकर, शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, उपाध्यक्ष रमेश पुरेकर, सचिव संजय शेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन चौगुले, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, चाटे शिक्षण समूहाचे भरत खराटे, माजी रणजीपट्टू शैलेश भोसले, ॲड. कमल सावंत, अभिषेक बोके आदी मान्यवर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवात आरका स्पोर्ट्स् कंपनीने देशामध्ये केली. याच आरका स्पोर्ट्स् कंपनीशी पुण्याच्या क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमीने करार केला. यांच्याशी करार करून शाहूपुरी जिमखाना, चाटे शिक्षण समूहाने येथे महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवात येत्या रविवारी करण्यात येणार आहे.
ॲकॅडमी वर्षभर सुरू ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात सराव करण्यासाठी जिमखान्यात इनडोअर सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. दहा, १२, १४, १६, १९, सिनियर अशा वयाच्या गटामध्ये विभागणी करून सराव शिबिरे घेण्यात येणार आहे. त्या-त्या वयोगटात जास्तीत जास्त सामन्यांचा अनुभवासाठी स्पर्धा चालवण्याबाबत नियोजन करणार येईल. प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त २० खेळाडूंचा समावेश असेल.
पत्रकार परिषदेला अमोल माने, चाटे शिक्षण समूहाचे भरत खराटे, धवल पुसाळकर, विजय भोसले, केतन शहा, दिवाकर पाटील उपस्थित होते.
नोकरीची हमी
सिनियर खेळाडूंना त्यांचे क्रिकेट संपल्यावर कोचिंग, अंपायरिंग, फिजिकल ट्रेनर इतर प्रकारामध्ये नोकरी मिळण्याबाबत प्राधान्य देण्याबाबत करार केला असल्याने लेव्हल एकची परीक्षा सुविधा देताना (नाममात्र फी भरून) नोकरीची हमी देण्याबाबत विचार केलेला आहे.