न्यायालयाच्या निकालानंतर ठरावधारकांच्या उचलाउचलीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:18+5:302021-04-28T04:26:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणुकीची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणुकीची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मंगळवारी दुपारनंतर ठरावधारकांच्या उचलाउचलीला वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांकडून सावधानता म्हणून व्यूहरचना आखली जात आहे. आज, बुधवारी बहुतांशी ठरावधारक अज्ञातस्थळी असणार हे निश्चित आहेत.
काेरोनाचा वाढता संसर्गामुळे निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. एकूणच काेरोनाची परिस्थिती पाहता निवडणूक लांबणीवर जाणार, असा अंदाज सत्तारूढ गटाला होता. त्यामुळे त्यांच्याकडून ठरावधारकांबाबत त्यांची सावधच भूमिका होती. विरोधी आघाडीकडून भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. सोमवारी सुनावणीनंतर पुढील निर्णय घ्यायचा असे नियोजन सत्तारूढ गटाचे होते. सोमवारची सुनावणी मंगळवारी झाली आणि निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यानंतर दोन्ही आघाड्यांकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. राधानगरी, करवीर, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत ठरावधारक उचलण्यात येत आहेत. भागनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांवर ठरावधारकांना आणण्याची जबाबदारी सोपविली आहे. आठ-दहा जणांना एकत्र आणून त्यांना रिसाॅर्ट, फार्म हाऊसवर ठेवले जात आहे. दोन्ही आघाड्यांची तयारी पाहता आज बहुतांशी ठरावधारक हे अज्ञातस्थळी असणार हे निश्चित आहे.
ऐंशी ‘सर’ विरोधी आघाडीसोबत
‘गोकुळ’च्या ठरावधारकांमध्ये १५३ माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे. मंगळवारी काेल्हापुरातील एका हॉटेलमध्ये विरोधी आघाडीने बोलाविलेल्या बैठकीला ८० आजी, माजी माध्यमिक शिक्षक होते. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांनी ठरावधारकांना मार्गदर्शन केल्याचे समजते.
भुदरगडमधील ठरावधारकाचा हृदयविकाराने मृत्यू
‘गोकुळ’च्या ठरावधारकांचा मृत्यू थांबत नाही. यापूर्वी डोणोली (ता. शाहूवाडी) व बुबनाळ (ता. शिरोळ) येथील दोन ठरावधारकांचा काेरोनाने मृत्यू झाला. मंगळवारी भुदरगड तालुक्यातील एका ठरावधारकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समजते.