नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 06:04 PM2020-09-28T18:04:15+5:302020-09-28T18:06:44+5:30
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे जरी बंद ठेवण्यात आली तरी त्या-त्या देवतांची नित्यनियमाने होणारी पूजाअर्चा सुरूच आहे. यंदाचा नवरात्रौत्सव अवघ्या अठरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची तयारी म्हणून करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची स्वच्छता व रंगरंगोटी केली जात आहे. त्यात चारही दरवाजे आणि आतील लोखंडी ग्रीलचे दरवाज्यांचेही रंगकाम करण्यात आले आहे.
यंदा जरी भक्तांची हजेरी नसली तरी या नऊ दिवसांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. याशिवाय परंपरेप्रमाणे नित्यविधीही मंदिराच्या आवारात केले जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या केदारलिंग जोतिबा देवस्थान वाडी रत्नागिरी येथे देवस्थान समितीमार्फत काळभैरव मंदिर पुनर्बांधणी, दीपमाळ दुरूस्ती, मंदिर आवारातील पाणी निचरा व फरशीची दुरुस्ती या कामांचा प्रारंभ सोमवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, सचिव विजय पोवार, कनिष्ठ अभियंता सुयश पाटील, महादेव दिंडे, प्रकल्प वास्तू विशारद राजेंद्र सावंत, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे यांच्यासह पुजारी आणि देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.