शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:33+5:302021-02-13T04:24:33+5:30
कोल्हापूर : शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१९) शिवजयंती असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताके विक्रीसाठी ठेवण्यात आले ...
कोल्हापूर : शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१९) शिवजयंती असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळे खरेदीसाठीही गर्दी होत आहे. शिवाजी पेठेतही शिवजयंतीचे वातावरण सुरू झाले असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोरोना असल्यामुळे काही नियम व अटींचे पालन करून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. बालचमूंसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून याचे नियोजनही सुरू केले आहे. रुक्मिणीनगर येथे शिवाजी महाराज यांचे पुतळे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुतळा खरेदीसाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे. बाजारपेठेतही शिवजयंतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहे.
शिवाजी पेठेची शिखर संस्था असलेल्या शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. यंदाही शिवजयंती उत्सव उत्साहातच करण्याचा निर्धार केला आहे. उभा मारुती चौकात भव्य असा २२ बाय ६० फुटाचा मंडप उभारला असून, त्यावर शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू आहे. शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने बुधवार (दि.१६) पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. यामध्ये दुचाकी रॅलीकडून शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आगमन होणार आहे. याचदिवशी नेत्रतपासणी, चष्मे वाटप होणार आहे. १७ रोजी पोवाडा, १८ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, १९ रोजी मुख्य साेहळा, २० रोजी कोरोना योद्ध्यांचा सत्कार, २२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता, असे भरगच्च कार्यक्रम नियोजित आहेत.
फोटो : १२०२२०२१ कोल शिवजयंती न्यूज
फोटो : १२०२२०२१ कोल शिवजयंती न्यूज१
फोटो : १२०२२०२१ कोल शिवजयंती न्यूज३
ओळी : कोल्हापुरात शिवजयंतीच्या तयारी सुरु झाली आहे. रुक्मिनीनगर येथे शिवाजी महाराज यांचे पुतळे
तयार करण्याचे काम सुरु असून खरेदीसाठी गर्दी होत आहे.
फोटो : १२०२२०२१ कोल शिवजयंती न्यूज४
ओळी : शिवाजी पेठेतील शिखर संस्था असणाय्रा शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने उभा मारुती चौकात शिवकालिन किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
छाया : नसीर अत्तार