विमानतळावर नाईट लॅंडिंगसह धावपट्टी विस्तारीकरणास गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:15+5:302020-12-25T04:19:15+5:30
उचगाव : उजळाईवाडी येथील विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्त भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ३२ एकर जागेचे ...
उचगाव : उजळाईवाडी येथील विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्त भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ३२ एकर जागेचे संपादन केले जाणार आहे. धावपट्टी विस्तारीकरणाबरोबरच नव्या वर्षात नाईट लॅंडिंग ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
धावपट्टीचे कोल्हापूर - हुपरी रस्त्याच्या दिशेने विस्तारीकरण करण्यात येत आहे. याकरिता अतिरिक्त ६४ एकर जागेची गरज आहे.या जागेच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने ११ मार्च २०२० रोजी मान्यता दिली. त्यासाठी २६ कोटी निधीलाही मंजुरी दिली. या निधीपैकी १० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग केला आहे. उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात ३२ एकर जागेचे संपादन होईल. त्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. संपादित होणाऱ्या जागेचे ७/१२ उतारे, त्यानुसार तयार नकाशा, आधीचा प्राथमिक प्रस्ताव करवीर प्रांताधिकारी यांना सादर केला आहे. या जागेवर सुमारे ४०० हून अधिक खातेदार जमीन मालक आहेत. प्रत्येक गटातील खातेदारांना बोलावून संपादनाबाबत चर्चा केली जाणार आहे. कोल्हापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. काही अडथळे लवकरच दूर करण्यात येणार आहेत.
चौकट:
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे, विस्तारीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या आहेत. रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट आणि वीजपुरवठा आदी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आ. ऋतुराज पाटील यांनीही याअगोदर विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात पाहणी करून या कामाकडे विशेष लक्ष दिले आहे.