एक कोटी ६0 लाखांच्या निधीतून रस्ते पॅचवर्कच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 05:51 PM2019-11-27T17:51:19+5:302019-11-27T17:53:28+5:30
रस्त्यांचे पॅचवर्कचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली.
कोल्हापूर : शहरातील खड्ड्यांच्या पॅचवर्कसाठी महापालिकेने तातडीने एक कोटी ६0 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बुधवारी पॅचवर्कची कामे सुरू करण्यात आली. आरटीओ कार्यालय ते पितळी गणपती, बिंदू चौक ते शिवाजी पूल आणि क्रशर चौक ते साईमंदिर या मार्गांवरील कामे सुरू झाली आहेत. आज, गुरुवारी गोखले कॉलेज ते माउली पुतळा या मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्कचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली.
शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. विविध सामाजिक संघटना, पक्षाच्या वतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खराब रस्त्यावरून फैलावर घेतले जात आहे. महापालिकेकडे शहरातील सर्वच खराब रस्ते नव्याने करण्यासाठी पुरेसा निधी नाही. महापुरामध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे; त्यामुळे राज्यशासनाकडे ३५0 कोटींची मागणी केली आहे. या निधीला विलंब लागणार आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींनी ७५ लाखांचा निधी दिला आहे. तातडीचा उपाय प्रशासनाने एक कोटी ६0 लाखांचा निधी मंजूर केला. बुधवारी या निधीतील कामांना सुरुवात झाली. दिवसभरामध्ये शहरातील प्रमुख मार्गांवरील पॅचवर्क करण्याचे काम हाती घेण्यात आले. चार दिवसांमध्ये बहुतांशी ठिकाणी पॅचवर्क केले जाणार आहे.