गत हंगामातील १०० रुपयांच्या हप्त्यास मान्यता द्या, राजू शेट्टी यांची पालकमंत्री मुश्रीफांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:28 PM2024-05-31T12:28:30+5:302024-05-31T12:30:41+5:30
कोल्हापूर : आंदोलनात मध्यस्ती करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गत वर्षाच्या उसाला प्रतिटन १०० आणि ५० रुपये देण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता ...
कोल्हापूर : आंदोलनात मध्यस्ती करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गत वर्षाच्या उसाला प्रतिटन १०० आणि ५० रुपये देण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत त्यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली. या वेळी मुश्रीफ यांनी ठरल्याप्रमाणे आचारसंहिता संपल्यानंतर मुख्य सचिवांना भेटून तातडीने या प्रस्तावास मान्यता देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगितले.
गत वर्षाच्या उसाला दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन छेडत राष्ट्रीय महामार्ग बंद केले होते. त्या वेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी मध्यस्ती करीत शासनाकडून मान्यता घेऊन १०० आणि ५० रुपये प्रतिटन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. म्हणून शेट्टी यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन ठरल्याप्रमाणे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी शेट्टी म्हणाले, जिल्ह्यात यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील डोंगरी भागातील उसासह इतर पिके पाण्याविना करपली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अनेक तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा.