शाहूवाडीच्या शिक्षण विभागाला रिक्तपदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:32+5:302021-03-01T04:27:32+5:30

सरुड : गेल्या चार वर्षांपासून शाहूवाडी तालुक्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून शिक्षकांच्या ...

Acceptance of vacancies to Shahuwadi Education Department | शाहूवाडीच्या शिक्षण विभागाला रिक्तपदांचे ग्रहण

शाहूवाडीच्या शिक्षण विभागाला रिक्तपदांचे ग्रहण

Next

सरुड : गेल्या चार वर्षांपासून शाहूवाडी तालुक्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून शिक्षकांच्या तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, यांची सुमारे १८३ पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात रिक्त राहिलेली पदे भरण्याच्या लोकप्रतिनिधी व पालकांच्या मागणीला जि. प.मधील संबंधित विभागाच्या प्रशासनाने वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावल्याने आजही शाहूवाडीच्या शिक्षण विभागातील रिक्त पदाचे ग्रहण सुटलेले नाही.

शाहूवाडी तालुक्यांत २६८ प्राथमिक शाळा आहेत. शिक्षकांच्या एकूण ८४४ मंजूर जागांपैकी ६९५ शिक्षक कार्यरत असून, सुमारे १४९ जागा रिक्त आहेत यामध्ये विषय शिक्षकांच्या ६८, तर अध्यापकांच्या ८१ जागांचा समावेश आहे . कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांत जास्त रिक्त पदे शाहूवाडी तालुक्यात आहेत. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यातील शिक्षकांची ही रिक्त पदे भरण्यास जि. प.च्या शिक्षण विभागाला सपशेल अपयश आले आहे. तालुक्यातील दुर्गम वाड्या वस्त्यावरील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या जास्त आहेत . मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदामुळे तालुक्यातील बहुंताश प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदासारखीच अवस्था पंचायत समितीकडील शिक्षण विभागामधील इतर विविध पदांच्या रिक्त जागांची आहे .सध्या गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार प्रभारीकडेच आहे, तर सहा मंजूर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांपैकी केवळ एकच शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत आहे. या पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची संपूर्ण तालुक्यातील कामकाज पाहताना अक्षरश: दमछाक होत आहे. केंद्रप्रमुखांच्या २३ मंजूर पदांपैकी सहा केंद्र प्रमुखच कार्यरत आहेत, तर १७ ठिकाणी केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त आहेत .परिणामी एका एका केंद्र प्रमुखाला तीन तीन केंद्रांचा कार्यभार सांभाळावा लागत आहेत, तर १० शाळा मुख्याध्यापकाविनाच आहे . तसेच कार्यालयामध्ये अधीक्षक व कनिष्ठ सहायक अशी दोन पदे रिक्त आहेत. या सर्व रिक्त जागाचा विपरीत परिणाम शिक्षण विभागातील संपूर्ण कामकाजावर होत आहे. परिणामी अतिरिक्त कामाचा ताण सहन करत या विभागाचे कामकाज पाहताना कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसह, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Web Title: Acceptance of vacancies to Shahuwadi Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.