बदल स्वीकारून यशाकडे वाटचाल करा _ आर. माधवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:13 AM2017-09-19T01:13:58+5:302017-09-19T01:15:46+5:30
कोल्हापूर : छोट्या-छोट्या चांगल्या बदलांतून व्यक्तिमत्त्व घडत असते. विविध स्वरूपांतील असे चांगले बदल स्वीकारून यशाकडे वाटचाल करा,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छोट्या-छोट्या चांगल्या बदलांतून व्यक्तिमत्त्व घडत असते. विविध स्वरूपांतील असे चांगले बदल स्वीकारून यशाकडे वाटचाल करा, असे आवाहन चित्रपट अभिनेता आर. माधवन यांनी सोमवारी येथे तरुणाईला केले. येथील ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ संस्थेतर्फे आयोजित ‘इन्स्प्रिरेशन’अंतर्गत दोन हजार विद्यार्थिनींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रातील या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रवीण घाटगे, कौस्तुभ मराठे प्रमुख उपस्थित होते. चित्रपट अभिनेता आर. माधवन आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी भरपावसात तरुणाईने गर्दी केली होती. विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
चित्रपट अभिनेता आर. माधवन म्हणाले, आपल्या शिक्षण, ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा. दुसºयांवर विसंबून राहू नका. दोन हजार विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचा उपक्रम प्रेरणादायी ठरणारा आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, महाविद्यालयीन जीवनातच आपल्या आयुष्याची ब्ल्यू प्रिंट ठरवा. त्यात आत्मविश्वास, आत्मभानाचा समावेश करावा. कोणतेही क्षेत्र निवडा. मात्र, त्यात अव्वल स्थानी जाण्याचे ध्येय ठरवा. स्वत:वर विश्वास ठेवा.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, तरुणाईने आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करावा. दोन हजार विद्यार्थिनींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा मिलिंद धोंड यांच्या ‘एनजीओ कम्पॅशन-२४’चा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, समाजातील वंचित-दुर्बल घटकांना बळ देण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्यापरीने योगदान द्यावे. चांगल्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हावे.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख उपस्थितांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून झाला. त्यानंतर विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डी. आर. मोरे, सुजित चव्हाण, आकाश कोरगांवकर, आदी उपस्थित होते. ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी उपक्रमांची माहिती दिली.
कसे, काय, कोल्हापूर ?
कसे, काय, कोल्हापूर? अशी मराठीत विचारणा करीत आर. माधवन यांनी बोलण्यास सुरुवात केली. बºयाच कालावधीनंतर कोल्हापुरातील ओळखीचे चेहरे पाहून खूप बरे वाटले. एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी दाखल करण्याकरिता मला वडिलांनी नेले. मात्र, तेथील वातावरण पाहून तेथून त्यांनी थेट येथे आणले. या दिवशी राजाराम कॉलेजकडे सकाळी रिक्षातून जात होतो. रिक्षात बसताच अंबाबाईचे सुप्रभात गीत लागले आणि हाच शुभशकून मानून माझे शिक्षण येथे करण्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केला. शिवाजी विद्यापीठातील अभ्यासिकेत पहिल्यांदा ज्या मुली शेजारी बसलो, तीच आज माझी पत्नी आहे. तिला कागलमध्ये मी प्रपोज केले, अशा विविध आठवणी त्यांनी सांगितल्या.
पावसातही तरुणाईचा उत्साह
दुपारी साडेचार वाजताच लोककला केंद्र सभागृह तरुणाईच्या गर्दीने खचाखच भरले. कार्यक्रम सुरूहोताच पाऊस सुरु झाला. भरपावसात छत्रीचा आधार घेत अनेक युवक-युवतींनी, तर काहीजण भिजत कार्यक्रमासाठी थांबून होते. चित्रपट अभिनेता आर. माधवन आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच तरुणाईने एकच जल्लोष केला. त्यांच्या मार्गदर्शनावेळी उपस्थित तरुणाईने टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद देत राहिली.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सोमवारी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ संस्थेतर्फे दोन हजार विद्यार्थिनींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी डावीकडून ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ चे अध्यक्ष मिलिंद धोंड, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रवीण घाटगे, कौस्तुभ मराठे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. यावेळी आर. माधवन यांना ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ तर्फे रेखाचित्र भेट देण्यात आले.