गुणवत्तेवरच ‘अनुदानित’ मध्ये प्रवेश
By admin | Published: June 26, 2014 12:34 AM2014-06-26T00:34:03+5:302014-06-26T00:36:35+5:30
तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या : संपतराव गायकवाड; ‘अकरावी’ प्रवेशाबाबत प्राचार्यांना सूचना
कोल्हापूर : अकरावीसाठी अनुदानित तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावरच प्रवेश देण्यात यावेत. शिवाय प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या, असे आवाहन सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी आज, बुधवारी येथे केले.
कोल्हापूर शहर वगळता जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत आयोजित प्राचार्यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण (उच्च) विभागातर्फे राम गणेश गडकरी सभागृहात ही सभा झाली.
गायकवाड म्हणाले, अकरावीसाठी तुकडी, तिची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणातच प्रवेश देण्यात यावेत. महाविद्यालयांतील अनुदानित तुकड्यांमध्ये गुणवत्तेनुसारच प्रवेश व्हावेत. अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून कमी गुण असलेल्यांना या तुकड्यांत प्रवेश देऊ नका. शिवाय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तुकडीत ढकलू नय, अशा पद्धतीने प्रवेश दिल्यास ते अमान्य करण्यात येतील. सामाजिक, वैधानिक, आदी आरक्षणाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. विनाअुनदानित महाविद्यालयांतील विज्ञानसाठी पाच हजार, वाणिज्यसाठी तीन हजार, तर कलाशाखेसाठी दोन हजार प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. मात्र, तरीही काही महाविद्यालयांत यापेक्षा जादा शुल्क आकारले जाते. काही ठिकाणी शुल्क नियमाप्रमाणे घेतात, पण पावती देत नाहीत, असे प्रकार होऊ नयेत.
या सभेत माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी एस. बी. पाटील, उपशिक्षणाधिकारी पी. टी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक उपनिरीक्षक के. डी. भाट, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एस. ओतारी, ए. एम. आकुर्डेकर, एस. के. यादव, बी. डी. टोणपे, आर. व्ही. कांबळे, एन. एस. गुरसाळे, आदींसह १५० प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सहायक उपनिरीक्षक सुरेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)