Accident: कात्रज येथे अपघात, तुरंबेचा एकजण ठार; भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:02 AM2022-04-27T11:02:45+5:302022-04-27T11:03:18+5:30
कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ गाडी दुभाजकाला जोरात धडकली. बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वीच उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकास धडक बसली. त्यामुळे गाडीच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला.
तुरंबे : पुण्यातील कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ तुरंबे (ता राधानगरी) येथील बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. दुभाजकाला गाडीची जबर धडक बसल्याने चालक दगडू शामराव पसारे (वय ५०, रा. तुरंबे, ता. राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू केरबा जरग (५६, रा. तुरंबे, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. हा अपघात काल, मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास झाला. घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
तुरंबे ( ता राधानगरी ) येथील भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग हे बंधू गणपती जरग यांना सोमवारी रात्री उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात होते. कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ गाडी दुभाजकाला जोरात धडकली. बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वीच उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकास धडक बसली. त्यामुळे गाडीच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला.
यामध्ये चालक दगडू पसारे हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते, लहुजी जरग यांच्या बरगड्याना गंभीर दुखापत झाली. गाडीतील गणपती जरग, प्रदीप देवर्डेकर हे किरकोळ जखमी झाले. तात्काळ जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पसारे हे मृत असल्याचे डॉक्टरानी सांगितले.
अपघाताचे वृत्त तुरंबे गावात समजताच नातेवाईक व ग्रामस्थानी पुण्याकडे धाव घेतली. या घटनेमुळे तुरंबे गावावर शोककळा पसरली आहे.उशिरा पर्यंत घरच्यांना घटनेची माहिती नव्हती.मृत पसारे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
लहू जरग हे भाजपचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे निकटचे कार्यकर्ते आहेत. अपघाताची माहिती त्यांना पहाटे कळताच तत्काळ भाजपच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमीवर वेळेत उपचार करण्यास पाटील यांचे सहकार्य मिळाले.