Kolhapur- सहापदरी महामार्गाचा विचका : धोकादायक खोदकाम, खड्डे, अपूर्ण काम; सूचना फलकांचा अभाव
By संदीप आडनाईक | Published: June 19, 2024 12:29 PM2024-06-19T12:29:12+5:302024-06-19T12:31:21+5:30
सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू
संदीप आडनाईक
कोल्हापूर : रोज किमान ९० हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या स्वप्निल स्वर्णिम चतुर्भुज परियोजनेतील सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, ठिकठिकाणी धोकादायक खोदकाम, महामार्गाला लागून असलेले खड्डे, बाजूपट्ट्यांवरचे अपूर्ण काम, वळण रस्ते, उपमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांना नसलेले फलक, सांडपाणी तसेच पावसाचे साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, उघड्या सळ्या यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा प्रकल्प म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा ठरत आहे.
कर्नाटकच्या हद्दीतील कागल तालुक्यातील कोगनोळी गावापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील घुणकी येथील वारणा नदीवरच्या पुलापर्यंतच्या या पुणे ते बंगळुरू या राष्ट्रीय (जुना नंबर-एन.एच.४) महामार्गावरील कामाची पाहणी लोकमतच्या प्रतिनिधीने सोमवारी केली. ४५ किलोमीटरच्या या प्रवासासाठी पाऊण तास लागण्याची अपेक्षा असताना दीड तास लागला. या प्रवासात वाहनधारकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते याची प्रचिती आली. सहापदरीकरणाचे बंगळुरूपासून कागलपर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु, कागलपासून वारणा नदीवरील पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे साम्राज्य आहे. तेथे शेवाळ निर्माण झाल्याने दुर्गंधी येते ती वेगळीच.
काम पूर्ण तरी मध्यभागी दाेन फूट उंचवटे
उजळाईवाडी जवळ बाजूपट्ट्याचे समतलीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्ण आहे, मात्र उंचवट्यामुळे दोन भाग झाले आहेत. तेथील दोन फूट उंच उंचवटा तसाच आहे. संपूर्ण महामार्गावर सुमारे १३ ते १४ ठिकाणी वळण रस्ते आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चुकीच्या दिशेने वाहनांना जावे लागते. गोकूळ शिरगावच्या रस्त्यावर पाइपलाइनचे तोंड उघडेच आहे. पाणी साठल्यास येथे उतार समजून येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. लक्ष्मी टेकडीजवळ पाइपलाइनवर धोकादायक पद्धतीने सळया दिसतात.
फलकांचा अभाव...
अनेक ठिकाणी जेसीबीने दगड फोडण्याचे काम सुरू आहे. तेथे फलकच नाहीत. तावडे हॉटेल परिसरात कोल्हापूरकडे वळण्यासाठीही फलक नाही, त्यामुळे बाहेरचे प्रवासी गोंधळून जातात. तावडे हॉटेलपासून सांगली फाट्याजवळ महामार्गावर ठळक अक्षरात वळण रस्त्याचा फलक नाही. सांगलीकडे वळायचे त्या पुलाखाली अवैध वाहतूक करणारी वाहने थांबून आहेत. शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बोगदा तर अस्वच्छतेचे आगार बनलेले आहे. बोगद्यात ठिकठिकाणी माती आणि दगडांचे खच पडलेले आहेत.
समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूत
सादळे-मादळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील वळण रस्ता धोकादायक आहे. येथे अनेक वाहने चुकीच्या दिशेने येतात. मंगरायाचीवाडी येथील वळण रस्त्याच्या बाजूला जोडलेल्या दोन रस्त्यांच्या मध्यभागातील चरी बुजविलेल्याच नाहीत. अनेक ठिकाणांचे समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूत ठरतात. एकूण वाहनधारकांना या मार्गावर सुलभ प्रवास करता येत नाही.
अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची अडवणूक
महामार्गावर बाहेरून येणाऱ्या तसेच जिल्ह्यातील प्रवाशांच्या वाहनांना वाहतूक पोलिस अडवणूक करताना आढळले. कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरात तसेच टोपजवळ या पोलिसांमुळेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.