निपाणीजवळ अपघात; आईसह दोन मुली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:13 AM2018-01-03T01:13:02+5:302018-01-03T01:13:11+5:30
निपाणी : चालकाचा ताबा सुटून कार झाडावर आदळून उलटली. या भीषण अपघातात दोन मुलींसह माता ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे पुणे-बंगलोर महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटाच्या पायथ्याशी झाला. अपघातातील मृत व जखमी मुंबई येथील आहेत. गोवा येथे नववर्षाचे स्वागत करून मुंबईला परतताना गुप्ता कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सावित्री गुलाबचंद गुप्ता (वय ४१), शोभा गुलाबचंद गुप्ता (२५), आरती गुलाबचंद गुप्ता (२१) या तिघी या अपघातात ठार झाल्या आहेत, तर नीलेश गुलाबचंद गुप्ता (४१), रवी मोहनलाल गुप्ता (२९) आणि चालक सूर्या साई (२२) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत.
मुंबई येथील गुप्ता कुटुंबीय नवीन वर्षाचे स्वागत आणि पर्यटनाच्या निमित्ताने स्विफ्ट कारने गोव्याला गेले होते. सोमवारी (दि. १) ते मुंबईला परत जाण्यासाठी गोव्याहून निघाले. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास तवंदी घाटाच्या पायथ्याशी असणाºया चव्हाण मळ्याजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे महामार्ग आणि सेवा रस्त्याच्या मधल्या पट्ट्यातील झाडांवर कार वेगाने आदळली आणि तीन ते चारवेळा उलटली. या अपघातात सावित्री, शोभा व आरती या जागीच ठार झाल्या. तर नीलेश गुप्ता, रवी गुप्ता आणि सूर्या साई हे तिघे गंभीर जखमी झाले.
अपघातस्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रवींद्र गडादी, डीवायएसपी अंगडी, सीपीआय किशोर भरणी यांनी पाहणी केली. फौजदार शशिकांत वर्मा, सहायक फौजदार डी. बी. कोतवाल यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी पंचनामा केला.
घटनास्थळी दृश्य हृदयद्रावक
कार उलटत असतानाच गाडीतून काहीजण बाहेर फेकले गेले, तर काहीजण गाडीत अडकून पडले होते. कारचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते.
महामार्गावरून जाणाºया प्रवाशांनीच जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर जखमींना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पुंज लॉईडच्या कर्मचाºयांनी आणि महामार्ग पोलिसांनी सुरळीत केली.