कार कालव्यात बुडाली, पाच जणांना जलसमाधीे, बेळगाव जिल्ह्यातील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:11 AM2019-01-15T11:11:21+5:302019-01-15T11:18:16+5:30
कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संक्रातीच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात कार गाडी कालव्यात बुडल्याने पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत कारचालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.
बेळगाव : कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संक्रातीच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात कार गाडी कालव्यात बुडल्याने पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत कारचालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.
सौन्दत्ती तालुक्यातील मुरगोड तालुक्यातील कडबी शिवापूर गावाजवळ कार रस्त्याशेजारील कालव्यात बुडाल्याने या घटनेत पाच जणांचा दुदैर्वी अंत झाला.
सोमवारी रात्री १0 वाजण्याच्या सुमारास घटप्रभा नदीवरील कालव्यामध्ये हा अपघात झाला. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. यात पाच जणांना जीव गमवावा लागला. मात्र सुदैवाने कार चालक अडव्यापा माळगी हा या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.
अंतिम संस्कार आटोपून परतताना हा अपघात झाला. फक्कीरवा पूजेरी(२९) , हनुमंत पुजेरी(६०), लगमाना पूजेरी ( ३८), पारव्वा पूजेरी (५०), लक्ष्मी पूजेरी (४०) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनजणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
मात्र, रात्री उशिर झाल्याने पाण्यात वाहून गेलेले इतर मृतदेह शोधण्याचे काम बंद करण्यात आले होते. उर्वरित दोन मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सकाळपासून सुरु झाले आहे. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असून या अपघाताची नोंद मुरगोड पोलिसात झाली आहे.