बेगवडेच्या जवानाचा अपघाती मृत्यू--बहिरेवाडीत उद्या अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:16 AM2017-10-13T01:16:41+5:302017-10-13T01:16:51+5:30
उत्तूर/गारगोटी : जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणाºया लष्करी गाडीचा अपघात होऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तूर/गारगोटी : जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणाºया लष्करी गाडीचा अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मूळ गाव बेगवडे (ता. भुदरगड) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने दोन्ही गावांवर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आज, शुक्रवारी सायंकाळी पार्थिव पुण्यात येणार असून उद्या, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी, लडाखहून लष्करी गाडीतून कारगिल सीमेकडे दारूगोळा वाहून नेला जात होता. यावेळी टायर फुटल्याने गाडी उलटली. दारूगोळ्याचे बॉक्स येलकर यांच्या अंगावर पडले आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजण जखमी झाले. याबाबत लष्कराच्या सूत्रांनी आजरा तहसील कार्यालयास माहिती दिली.
येलकर हे मामा श्रीपती बाबू इंचनाळकर यांच्याकडे राहवयास होते. माध्यमिक शिक्षण बहिरेवाडी येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये झाले. ते केवळ दहावीच्या शिक्षणासाठी येथे आले होते. २००७ मध्ये ते सैन्यात भरती झाले. १० वर्ष सैन्यात सेवा बजावली.
येलकर यांना तीन वर्षांची प्राजक्ता ही मुलगी आहे. पत्नी पूनम हिचे हत्तीवडे (ता. आजरा) हे माहेर आहे. त्या गडहिंग्लज येथे पिराजी पेठेत राहतात. या घटनेची त्यांना कल्पना देण्यात आलेली नाही. आई शालन व वडील तानाजी दोघे नवी मुंबई येथील मुलांकडे राहतात. त्यामुळे जन्मगावी कोणी नाही.
दरम्यान, येलकर यांच्या १३८ मेड रेजिमेंट आर. टी. युनिटमधील जवान जम्मूवरून विलास पाटील सुटीवर आले होते. लष्कराच्या अधिकाºयांनी त्यांना ही कल्पना दिली. त्यानंतर पाटील यांनी संबंधितांना ही माहिती दिली. त्यांच्या मृत्यूची बातमी बहिरेवाडी, बेगवडे येथे समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
ग्रामपंचायत निवडणूक प्रचार बंद
मेजर प्रवीण येलकर यांचा पार्थिव खराब हवामानामुळे आज, शुक्रवारी सायंकाळी लष्कराच्या विमानाने येणार असून, शनिवारी सकाळी पार्थिव बहिरेवाडी येथे आणले जाणार आहे. भैरवनाथ महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत येलकर यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्तहोत आहे. गावात दोन दिवस प्रचार बंद राहणार आहे.