उद्योजक प्रदीप सोळंकी यांचा अपघाती मृत्यू
By Admin | Published: April 24, 2017 07:21 PM2017-04-24T19:21:03+5:302017-04-24T19:21:03+5:30
नागाळा पार्क येथे दुचाकी घसरुन दूर्घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : नागाळा पार्क परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीच्या धक्याने मोपेड घसरुन दूभाजकाला डोके धडकून शितपेय उद्योजकाचा दूर्देवी मृत्यू झाला. प्रदीप पांडुरंग सोळंकी (वय ६१ रा. नागाळापार्क) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईकांनी सीपीआर परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अधिक माहिती अशी, उद्योजक प्रदीप सोळंकी यांचे भाऊसिंगजी रोडवर शितपेयाचे दुकान आहे. त्यांची दोन मुले रोहित व याहित हे वडीलांना कामात मदत करतात. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी दुकानात गेले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मोपेडवरुन जेवणासाठी घरी निघाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवरंग अपार्टमेंटजवळ येताच समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराने त्यांच्या मोपेडच्या उजव्या बाजूच्या हॅन्डेला धक्का दिला.
सोळंकी हे मोपेडसह खाली पडून पंधरा फुट फरफटत गेले. यावेळी रस्ता दूभाजकाला डोके आपटून गळ्याला गंभीर दूखापत झाली. त्यांच्या डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाला होता. त्यांचे भाऊ किरण सोळंकी हे पाठीमागून येत होते. त्यांनी कारमधून सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. यावेळी कुटूंबियांनी केलेला अक्रोश ऱ्हदय पिळवटून टाकणारा होता.मृत सोळंकी यांच्या मोपडला धक्का देणारा दुचाकीस्वार पसार झाला आहे. त्याचा शाहूपुरी पोलिस शोध घेत आहेत.
वाढदिवसादिवशी काळाचा घाला
प्रदीप सोळंकी हे शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे अशा मोठ्या परिवारासोबत ते राहत होते. सोमवारी त्यांचा वाढदिवस होता. संध्याकाळी वाढदिवस सेलिब्रेशन करायची घरात तयारी सुरू होती. नातेवाईक, मित्र परिवराही येणार होते. काहींनी सकाळपासून मोबाईलवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. अशा आनंदी वातावरणात त्यांच्या अपघाती मृत्यूने क्षणात दूख:चे सावट पसरले.