लिंगनूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू
By admin | Published: January 8, 2015 12:42 AM2015-01-08T00:42:36+5:302015-01-08T00:46:04+5:30
एक महिन्याची सुटी संपवून ते महिन्यापूर्वीच ड्यूटीवर गेले. त्यांची ही कुटुंबीयांसोबतची अखेरची भेट ठरली.
गडहिंग्लज : जम्मू-काश्मीर येथील डिगडोल येथे सेवा बजावत असताना लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील जवान सुनील शंकर जोशीलकर (वय ३८) यांचा अपघाती मृत्यू झाला. ते १०९ टी.ए. बटालियनच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नायक रँकवर कार्यरत होते. पहारा देत असताना सूचीपर्णीचा वाळलेला मोठा वृक्ष कोसळल्याने ही घटना घडल्याचे समजते.
याबाबत माहिती अशी, जम्मू-श्रीनगर मुख्य मार्गावरील आर्मीच्या गाड्यांवर अतिरेकी हल्ला होऊ नये यासाठी अखंड पहारा असतो. काश्मीर डिगडोल तालुक्यात ‘बॅटरी चष्मा क्रॉस’ या डोंगराळ भागात सुनील पहाऱ्यावर होते. दुपारी सोसाट्याचा वारा सुटून वाळलेले मोठे सूचीपर्णीचे झाड सुनील यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनानंतर पार्थिव आर्मीच्या विमानाने उद्या, गुरुवारी पुणे येथे, तर तेथून आर्मी अॅम्ब्युलन्सने कोल्हापुरात आणण्यात येणार
आहे. शुक्रवारी (दि. ९) सकाळी शासकीय इतमामात लिंगनूर येथे अंत्यसंस्कार होणार येणार आहेत. (वार्ताहर)
सुनील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
वडील शंकर जोशीलकर हे गडहिंग्लज एस.टी. आगारातून निवृत्त झाले असून, सुनील यांना अन्य दोन भाऊ आहेत. सुनील सर्वांत मोठे होते. मधला भाऊ धनंजय हा पुण्यातील खासगी कंपनीत, तर धाकटा उत्तम हाही सैन्यात असून, जम्मूमध्ये सेवा बजावत आहे. सुनील यांचा विवाह बेलेवाडी येथील संध्या यांच्याशी झाला असून, त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी सोनाली चौथीमध्ये, तर लहान मुलगी सई बालवाडीमध्ये शिकते.
सुनील दोन महिन्यांपूर्वी गावी सुटीवर आले होते. एक महिन्याची सुटी संपवून ते महिन्यापूर्वीच ड्यूटीवर गेले. त्यांची ही कुटुंबीयांसोबतची अखेरची भेट ठरली.