तावरेवाडी येथील जवानाचा अपघाती मृत्यू; सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:40 PM2023-05-03T20:40:40+5:302023-05-03T20:43:26+5:30
अपघाती मृत्यू झाल्याने तावरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
नेसरी: आजरा राज्य मार्गावर किणे (ता. आजरा) हद्दीत भरधाव अल्टो मोटर कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात तावरेवाडी ( ता. गडहिंग्लज ) गावचे जवान मसणू धोंडीबा मणगुतकर (वय 32 वर्षे ) यांचा जागीच मृत्यू झाला. नेसरी व आजरा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून सुट्टीवर आलेल्या जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने तावरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जवान मणगुतकर हे एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते. आपल्या मामाच्या मुलीचे लग्न उद्या ( गुरुवारी) असल्याने त्यांनी आपल्या अल्टो गाडीने ( एम एच-06-ए एस-8556) आईला हडलगे गावी सोडून आजरा कडे जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या झाडावर जोरात धडकली. त्यात त्यांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यु झाला. या अपघाताची बातमी समजताच तावरेवाडी ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेने त्यांना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघाताची माहिती त्यांच्या वरिष्ठ सैन्य दलातील अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. दिवसभर तावरेवाडी ग्रामस्थ व परिसरातील आजी माजी सैनिक नेसरी ग्रामीण रुग्णालयात उपास्थित होते. त्यांचे येथील तुकाराम कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयात बी ए चे शिक्षण झाले होते. मसनु हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे तावरेवाडी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची नोंद नेसरी पोलिसात झाली असून अधिक तपास ए. एस्. तडवी व सागर कांबळे करीत आहेत.
- मसणू मनगुतकर यांना सर्वजण अभिषेक या नावाने बोलवत असत. अतिशय सामान्य कुटुंबातील मसणू यांना पहिल्यापासून सैन्याची आवड होती. २०१८ साली जिद्दीने ते सैन्यात भरती झाले होते.
- त्यांनी शीख रेजीमेंट मधून लेह लडाख, लखनौ या ठिकाणी ५ वर्षे सेवा बजावली, सध्या ते विशाखापट्टनम येथे सेवेत होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"