नोकरीवर हजर होण्यापूर्वीच काळाचा घाला, पुण्याजवळ अपघात कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:35 PM2022-04-14T12:35:23+5:302022-04-14T12:42:29+5:30
कोल्हापूर : पुण्यात नोकरीवर हजर होण्यासाठी जाणारा २५ वर्षीय शंतनु पाटील, लाईन बझार याचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे वडील ...
कोल्हापूर : पुण्यात नोकरीवर हजर होण्यासाठी जाणारा २५ वर्षीय शंतनु पाटील, लाईन बझार याचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे वडील कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहेत.
कोल्हापूर लाईन बझारमधील शंतनु हा भारती विद्यापीठमध्ये बीबीएचे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीमध्ये बुधवारी हजर होण्यासाठी मंगळवारी मतदान करून संध्याकाळी ६ वाजता दुचाकी घेऊन पुण्याकडे गेला. तो जात असताना वाटेतील मित्राची भेट घेत गेला. रात्री उशिरा तो पुण्यामध्ये पोचला नाही म्हणून वडिलांनी पुण्यातील मित्राकडे चौकशी केली असता, तो आला नसल्याचे समजले.
त्यानंतर वडिलांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली व शोध मोहीम चालू केली. शाहुपुरी पोलिसांनी मोबाइल लोकेशन काढून माहिती घेतली. कोल्हापूरमधील सीआयडीचे उपअधीक्षक प्रवीण पाटील हे आपल्या माध्यमातून शोध घेत असता त्यांना अपघाताची माहिती मिळाली.
दरम्यान, त्याच्या खिशातील आधारकार्डवरून घरच्यांशी संपर्क झाला व घरचे, आईवडील, नातेवाईक व मित्र मंडळी पुण्याला गेले असता. खंबाडकी बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूच्या वळणावर त्याचा अपघात झाल्याचे समजले.
शंतनुचे महाविद्यालयीन शिक्षण हे इचलकरंजीतील खासगी महाविद्यालयात झाले असून, त्याचे बीबीएचे शिक्षण कोल्हापुरातील भारती विद्यापीठमध्ये झाले. त्याचे वडील कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात मुख्यालय या ठिकाणी कार्यरत असून त्यांना दोन मुलींच्या पाठीवर शंतनु होता. त्याच्या दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून ती पुण्यात नोकरी करते, तर दुसरी बहीण कोल्हापूरमध्ये नोकरी करते.
त्याचे आजोबाही कोल्हापूर पोलीस दलात होते. त्याचे वडील व आजोबा विलास पाटील बापू हे नामवंत हाॅकी खेळाडू आहेत. शंतनु हा नोकरीवर हजर होण्यासाठी पुण्याला जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मित्र परिवारासह लाईन बझारमध्ये शोककळा पसरली.