खेबवडेतील जवानाचा अपघाती मृत्यू
By admin | Published: November 2, 2016 12:57 AM2016-11-02T00:57:35+5:302016-11-02T00:57:35+5:30
मृत्यूबाबत संभ्रम
बाचणी : खेबवडे (ता. करवीर) येथील संग्राम दिनकर चौगले (वय २३) या जवानाचा राजस्थान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या मृत्यूबाबत संभ्रम आहे.
सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. संग्राम दिवाळीनिमित्त गावी सुटीवर आला होता; पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर बोलावून घेण्यात आले. दरम्यान, त्याच्यावर काळाने घाला घातला.
संग्रामचा जन्म २९ मे १९९३ रोजी झाला. त्याचे वडील वेल्डिंगचे काम करतात, तर आई घरकाम करते. त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण २००९ मध्ये खेबवडे हायस्कूलमध्येच झाले, तर १२ वी विज्ञानाचे शिक्षण शाहू कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. बारावीनंतर तो हैदराबाद येथे लष्करात आर्टिलरी सेंटरमध्ये २०११ मध्ये भरती झाला. त्यानंतर पाच वर्षे सेवा झालेल्या संग्रामचा कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द या गावातील सोनाली ज्ञानदेव जाधव हिच्याशी १२ एप्रिल २०१६ रोजी विवाह झाला होता.
लग्नानंतर तो सेवा बजावण्यासाठी पुन्हा रुजू झाला. लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी तो दहा दिवसांच्या सुटीवर आला होता. मात्र, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर हजर राहण्याचा आदेश मिळाल्याने तो तत्काळ कर्तव्य बजावण्यासाठी जात असतानाच त्याचा अपघातात मृत्यू झाला. संग्रामचा भाऊही लष्करात कार्यरत आहे. दरम्यान, या घटनेची उशिरापर्यंत गावासह त्याच्या घरापर्यंत काहीच माहिती नव्हती.