एका अपघाताने उधळतो जीवनाचा सारीपाट : अनेकांना कायमचे अपंगत्व; खर्चामुळेही कर्जबाजारीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:35 AM2020-02-21T00:35:38+5:302020-02-21T00:36:56+5:30
८० वर्षांचे एक ज्येष्ठ गृहस्थ अशा पद्धतीने आडवे आले की त्यांना वाचविण्यासाठी याला रस्ता दुभाजकावर गाडी घालावी लागली. त्याच्या डोक्याला खोक पडली. १५ दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. तो बरा होऊन घरी आला. सगळ्यांनी डोक्याला फार काही झालं नाही म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : बरोबर १० दिवसांपूर्वी ऐन विशीतले तीन तरुण पन्हाळा रस्त्यावर झालेल्या अपघातात ठार झाले. त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. होत्याचं नव्हतं झालं. अशा अनेक अपघातांनी अनेकांच्या आयुष्याचा सारीपाटच उधळला आहे. अनेकांना कायमचे जायबंदी केले आहे. अनेकदा जीव वाचतो; परंतु दवाखान्याच्या खर्चाने घर अनेक वर्षांनी मागे जाते. या अपघातांच्या कहाण्या अक्षरश: अंगावर शहारे आणणाऱ्या.
डोळ्यांदेखत पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडते, हातात हात घेतलेला नवरा कायमची साथ सोडून जातो, फिरायला गेलेल्या एखाद्याच्या आईला कसलीही चूक नसताना अपघाताने जग सोडावे लागते. आता कुठे ओठांवर मिसरूड फुटायला आलेल्या वयातील मुलाचे अवयव रस्त्यावरून गोळा करावे लागतात. एखादं फूल चुरगाळलं जावं तसं एखादं बालक ट्रकच्या चाकाखाली सापडतं... सगळंच सहन करण्यापलीकडचं.
इंजिनिअरिंगचा एक विद्यार्थी. खरे मंगल कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाकडे निघाला होता. ८० वर्षांचे एक ज्येष्ठ गृहस्थ अशा पद्धतीने आडवे आले की त्यांना वाचविण्यासाठी याला रस्ता दुभाजकावर गाडी घालावी लागली. त्याच्या डोक्याला खोक पडली. १५ दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. तो बरा होऊन घरी आला. सगळ्यांनी डोक्याला फार काही झालं नाही म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला.
पण, नियतीच्या मनात वेगळंच होत. दोन-तीन दिवसांतच त्याचे माध्यमिक शिक्षक असलेले वडील पत्नीसह रेणुका मंदिराजवळून जात असताना अचानक दहा-बारा कुत्री पळत आडवी आली. एक कुत्रे गाडीच्या मध्ये अडकले. दोघेही खाली पडले. पत्नीच्या डोक्याला मोठा मार लागला. सहा महिने दवाखान्यात उपचार सुरू होते. पहिल्यांदा वाचण्याचीच खात्री नव्हती; पण त्या वाचल्या. या शिक्षकांचा खांद्यातून हात निखळला. आठ लाख रुपयांचा खर्च आला. सगळं आर्थिक गणितच बिघडून गेलं.
नागाळा पार्कमधील एक सुखी कुटुंब. मुलगा कॉलेजला. घरात स्पोर्टस बाईक पाहिजे म्हणून हट्ट सुरू होता. वडिलांनी दुसरी गाडी देतो; परंतु ही स्पोर्टस बाईक नको म्हणून सांगितले. अचानक एके दिवशी दुपारी घरी निरोप आला की, मुलगा अपघातात गेला म्हणून. मित्राची स्पोर्टस बाईक घेऊन जाताना टीए बटालियनजवळ अपघात झाला आणि आणखी एका उमलत्या जिवाची अखेर झाली.
एक तरुण पत्रकार. एका मॉलसमोरून जात होता. गुजरीतील एका सराफी दुकानदाराची बुलेट न सांगता त्याच्या कामगारांनी आणली होती. त्यांना गाडीचा वेग आवरला नाही. त्यांनी याच्या गाडीला धडक दिली. गुडघ्याखाली पाय मोडला. शस्त्रक्रिया करावी लागली. दोन लाखांहून अधिक खर्च आला. तीन महिने घरात बसावे लागले.
अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यामुळे अशा अपघातानंतर एकीकडे त्या कुटुंबातील व्यक्ती दगावते. जिवंत राहिली तरी तिला कायमचे अपंगत्व येते. या सगळ्या काळामध्ये पैशाचे सोंग मात्र घेता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबीयांची सर्वच पातळ्यांवर जी ओढाताण होते, ती खरोखरच विदारक असते.
सुशिक्षित, आर्थिक स्तर चांगला असलेले बहुतांश जण वैद्यकीय विमा उतरवितात. त्यासाठीचे आवश्यक निकष काय आहेत, याची त्यांना माहिती असते. गाडी चालविण्याच्या परवान्यापासून गाडीच्या कागदपत्रांपर्यंत सर्व काही तयार असते; परंतु सगळ्यांचेच तसे नसते. वैद्यकीय विमा नसतो. गाडीची कागदपत्रे नसतात. घरातही सगळ्यांंचे पटत असते असे नाही. मग कुणाकडून तरी हातउसने पैसे घेऊन दवाखान्याची बिले भागविण्याची वेळ येते.
अपघात गंभीरच असेल तर अनेक वेळा अंथरुणावरच सर्व गोष्टी कराव्या लागतात. आई, भाऊ, बायको यांच्यावरच ही जबाबदारी येते. उपकाराच्या भावनेखालीही अनेकजण दबून जातात. एकीकडे आर्थिक तंगी, दुसरीकडे कामावर जाता येत नाही हे वास्तव, तिसरीकडे घरच्यांना आपला त्रास होतोय ही भावना, बघायला येणाऱ्यांचे सल्ले आणि मार्गदर्शन आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे होणाºया वेदना. या सगळ्यांचा परिणाम संबंधितावर होतच असतो. त्यामुळे धीराने सहन करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नसते.
वेदनेत नाही मात्र कुणी वाटेकरी...
अशी अनेक कुटुंबे आहेत की घरातील एखाद्या सदस्याचा अपघात झाला तरी आख्खं कुटुंब त्याच्या पाठीशी उभं राहतं. सर्व प्रकारची सोय होते. मात्र शेवटी ज्याच्या वेदना त्यालाच सोसाव्या लागतात. तिथे मात्र कुणीच वाटेकरी होऊ शकत नाही, हे प्रखर वास्तव आहे.
रुखरुख घेऊन जगायचं
आठच दिवसांपूर्वी ४७ वयाच्या महिलेचा मृत्यू झाला. पुण्याहून रात्री कोल्हापूरकडे येताना चारचाकी गाडी ट्रकवर आदळली. तीन महिने दवाखान्यात उपचार. लाखो रुपयांचा खर्च; तरीही अखेर त्यांच्या जीवनाची अखेर झाली; परंतु त्या आपल्या पतीला म्हणाल्या होत्या, ‘एवढ्या रात्री नको जायला कोल्हापूरला.’ त्याला आयुष्यभर एकच रुखरुख लागून राहणार, ‘मी तिचं ऐकायला पाहिजे होतं...’