पक्षासह उमेदवाराचे कर्तृत्व पाहून मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:01 AM2019-04-08T01:01:23+5:302019-04-08T01:01:30+5:30
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील पाच निवडणुकांत प्रत्येकी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस ...
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील पाच निवडणुकांत प्रत्येकी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी पक्ष, तर एकत्रित काँग्रेस असताना काँग्रेसला विजय मिळाला आहे. या मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाला म्हणजेच खासदार राजू शेट्टी यांना सरासरी ५१ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीला ४४, काँग्रेसला ४२, तर शिवसेनेला २५ टक्के मते मिळाली आहेत. शेट्टी यांच्या ५१ टक्क्यांत भाजप-शिवसेना युतीच्या मतांचाही समावेश आहे. या मतदारसंघात शेट्टी यांनी दोन खासदारांचा पराभव केला आहे. आतापर्यंत शिवसेनेने एकदाच आव्हान निर्माण केले आहे. जेव्हा उमेदवार तगडा असतो, तेव्हा भाजप-शिवसेनेलाही चांगली मते मिळाली आहेत.
शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांचा पराभव करून त्यांच्याकडून हा मतदारसंघ काढून घेतला. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांचाही पराभव केला. या निवडणुकीत मात्र श्रीमती माने यांचा मुलगा धैर्यशील माने शिवसेनेकडून पुन्हा नशीब आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीत शेट्टी यांना भाजप-शिवसेनेचा पाठिंबा होता, यावेळा त्यांना दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा आहे. या मतदारसंघात पहिल्या तीन निवडणुका पक्षीय वर्चस्वाच्या प्रभावाखाली झाल्या. अलीकडच्या दोन मात्र त्या चळवळीचा प्रभाव दाखविणाऱ्या ठरल्या. आताही वर्गीय लढा की पक्षीय, जातीय वर्चस्व या मुद्द्याभोवती केंद्रित होण्याची चिन्हे आहेत.