कोल्हापूरच्या समृध्दीत भर, श्रीमंतीत पुण्यानंतर नंबर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 02:35 PM2021-12-29T14:35:12+5:302021-12-29T14:36:59+5:30
नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गरिबीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात २९ वा लागतो. येथील १० टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : समृध्द शेती, रुजलेली सहकार चळवळ, अर्थकारणाची नाडी बनलेला साखर व दूध व्यवसाय आणि सतत नाविन्याची कास धरणारा उद्योग या घटकांनी कोल्हापूरला श्रीमंत बनवले असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र पुन्हा अधोरेखित झाले आहे.
नीती आयोगाने जाहीर केलेल्या गरिबी निर्देशांकामध्ये ही माहिती पुढे आली असून ती कोल्हापूरचे महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावरील स्थान दर्शवणारी आहे.
जिल्हा अन्नधान्याकडून समृध्द असल्याने येथे कुपोषणाचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत १.८२ टक्के आहे. पिण्याचे पाणी, वीज, पक्की घरे यांसह शैक्षणिक सुविधांच्या पातळीवर जिल्हा आघाडीवर राहिला आहे.
विभागात पुण्यानंतर कोल्हापूरच श्रीमंत
नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गरिबीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात २९ वा लागतो. येथील १० टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण कोल्हापूरपेक्षा अधिक आहे. पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे शहर व जिल्ह्यात ५.२९ टक्केच जनता गरिबी रेषेच्या खाली आहे. राज्याच्या तुलनेत गरिबीचे प्रमाण एकदम कमी असणाऱ्या जिल्ह्यात पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पुणे विभागात पुण्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो.
...यामुळे सुधारला आर्थिक स्तर
कोल्हापूर जिल्ह्यातील ७० टक्क्याहून अधिक जमीन ही सिंचनाखाली असल्याने नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातही शेतीला दूध व्यवसायाची जोड मिळाल्याने येथे बहुतांश कुटुंबे आपोआप सधन झाली आहेत. त्यामुळेच जिल्ह्याचा आर्थिक स्तर उंचावल्याने राज्याच्या तुलनेत गरिबीचे प्रमाण कमी दिसत आहे.
राज्यात गरिबीमध्ये टॉप टेन जिल्हे असे -
- जिल्हा गरिबीची टक्केवारी
- नंदुरबार ५२.१२
- धुळे ३३.२३
- जालना २९.४१
- हिंगोली २८.०५
- नांदेड २७.४८
- यवतमाळ २३.५४
- परभणी २३.३९
- बीड २२.६६
- वाशिम २२.५३
- गडचिरोली २०. ५८
जिल्ह्यातील वस्तुस्थिती टक्केवारीमध्ये :
- कुपोषणाचे प्रमाण - १.८२
- माता-अर्भक मृत्यू - १८.४५
- इंधन साधने - ४९.१२
- बँकेत खाती नाहीत - १३.८२
- पक्की घरे - ४८.६१
- शौचालय - ३८.०९
- अद्याप विजेच्या प्रतीक्षेत - १.४८
- पिण्याचे पाणी - ७.८३
- शाळाबाह्य विद्यार्थी - ३.९४
कोल्हापूर उद्योग आणि कृषी क्षेत्रात इतरांच्या तुलनेत पुढे आहे. दोन औद्योगिक वसाहती व त्यातील फौंड्रीमुळे रोजगार माेठ्या प्रमाणात आहे. इचलकरंजी तर रोजगार देणारे शहर बनले आहे. याचा एकत्रित परिणाम कोल्हापूरचा आर्थिक स्तर उंचावण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षाही कमी होऊ शकते. - प्रा. सुभाष कोंबडे, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.